काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)
काडी छोटी, पण इतिहास मोठा!
आजच्या काळात आपल्या घरात किंवा खिशात असलेली एक रुपयाची काडेपेटी (Matchbox) हि खूपच सामान्य वस्तू वाटते. परंतु ही आग पेटीत बंद करण्याची कला मानवाला सहज साध्य झाली नाही. अश्मयुगातील धडपडीपासून ते Safety Match box पर्यंतच हा आगीचा इतिहास मोठा रंजक आहे.
आग्नीचा शोध: आश्मयुगीन माणसाने कधीतरी सहज गारगोट्या घासल्या व त्यातुन आगीचा शोध लागला असावा हा अग्नी प्रज्वलनाचा प्रारंभिक इतिहास. त्याआधी मानवाने झाड्यांच्या फांद्याच्या घर्षणाने निर्माण झालेली किंवा वीज पडून जंगलात लागलेली आग अनुभवली असणार तसेच तिच्या विविध गुणधर्ममांचे हि निरिक्षण त्याने केले असावे.
आगीचा शोध मानवी सभ्यतेच्या विकासासाठी किती महत्त्वाचा टप्पा होता हे वेगळ सांगण्याची गरज नाही. एकतर आगीमुळे कच्चं मांस शिजवून खाणं शक्य झालं, ज्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होऊन मानवी मेंदूचा आकार आणि क्षमता वाढली. थंडीपासून बचाव आणि हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षा मिळाली. पण तेव्हापासून समस्या एकच होती ती म्हणजे आग प्रज्वलित करणं हे सोपं काम नव्हतं, आणि लागलेली आग विझु न देता जपून ठेवणं हे ही त्याहून कठीण काम होत .
भारतात आठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत जळता निखारा किंवा एखादी गोवरी चुलीत मधे आग प्रज्वलित करण्यासाठी राखुन ठेवत व चुल पेटवण्यासाठी तो निखार अथवा गोवरी वापरत तसेच ऐकमेकांना देत असत .
भारताप्रमाणेच युरोपीय हि काही वेगळी परस्थिती नव्हती काडेपेटीचा शोध लागण्यापूर्वी युरोपात आग निर्माण करणे ही एक अत्यंत कष्टाची आणि कौशल्याची गोष्ट होती. त्याकाळी Flint and Steel हीच सर्वात प्रचलित पद्धत होती; यात चकमकीचा दगड लोखंडी तुकड्यावर जोरात घासून उडालेली ठिणगी डबीतील 'टिंडर'वर (ज्वलनशील कापड किंवा वाळलेले गवत) वर झेलली जाई आणि मग त्यापासून गंधक लावलेली काडी पेटवली जाई. दिवसा कडक ऊन असताना काही लोक भिंगाचा (Burning Glass) वापर करून सूर्यकिरणांनी वाळलेला पालापाचोळा पेटवत, मात्र ढगाळ वातावरणात ही पद्धत कुचकामी ठरे.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ॲसिडमध्ये काडी बुडवून आग लावण्याचे काही महागडे व धोकादायक रासायनिक प्रयोगही झाले. आग नव्याने पेटवणे इतके जिकिरीचे काम होते की, लोक रात्री निखाऱ्यांवर राख टाकून घरातील आग विझू न देता 'जिवंत' ठेवत असत आणि तरीही आग विझल्यास शेजाऱ्यांकडून जळते निखारे मागून आणणे हाच शेवटचा उपाय उरत असे.
या सर्व समस्यांनवर उपाय शोधण्यासाठी विविध प्रयोग सुरू होते त्यात रसायनांचा वापर करून आग लावण्याचे प्रयोग झाले. १८२७ च्या सुमारास जॉन वॉकर यांनी पहिली 'घर्षण काडी' (Friction Match) बनवली. पण या सुरुवातीच्या काड्या म्हणजे धोक्याची घंटाच होत्या. त्या कधीही आणि कशाही घासल्या तरी पेट घ्यायच्या (अगदी खिशातल्या खिशात सुद्धा!) त्यामुळे सर्वसामान्य वापरासाठी त्या धोकादायक ठरल्या.
पुढे १८४४ मध्ये, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ गुस्ताव ई. पाश यांनी यामधे सुधारणा केली व सेफ्टी मॅच (Safety Matc) चा जन्म झाला. त्यांनी काडीवरील रसायन आणि पेटीवरचे रसायन (Red Phosphorus) वेगळे केले. त्यामुळे जोपर्यंत काडी पेटीच्या बाजूला घासली जात नाही, तोपर्यंत आग लागणार नव्हती .
हे तंत्र विकसित झाले आणि खऱ्या अर्थाने काडेपेटी लोकांच्या घरातील भाग बनली.
भारतात मात्र हि काडेपेटी सर्वसामान्य होण्यासाठी विसाव्या शतकाची सुरुवात होईपर्यंत वाट बघावी लागली. भारतात काडेपेटी पोहोचली, तरी ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती. त्याकाळी भारतात काडेपेटी बनवण्यासाठी लागणारे मऊ लाकूड (Aspen Wood) उपलब्ध नव्हते. त्यामुळे काडेपेट्या थेट स्वीडन आणि जपानवरून आयात केल्या जात त्यामुळे तिच्या उपलब्धतेवर व किंमतीवर याचा परिणाम होत असे.
पहिले महायुद्ध : (१९१३ ते १९१८ ) या युद्धकाळात भारतात वस्तूंचे भाव जवळपास दुप्पट झाले होत यामुळे सर्वसामान्य जनतेला या महागाईचा प्रचंड आर्थिक फटका बसला त्याकाळी भारतात काड्यांच्या पेट्या प्रामुख्याने स्वीडन आणि जपानमधून आयात केल्या जात या पुरवठ्याला युद्धामुळे फटका बसला कारण जगभर वाहतूक विस्कळीत झाली, त्यामुळे आयातीत घट झाली आणि काडीपेटी दुर्मिळ झाली.
भारतात त्यावेळी काडीपेटीचे उत्पादन खूपच प्राथमिक स्वरूपात होते, त्यामुळे स्थानिक पुरवठाही पुरेसा नव्हता. वाढलेले कर आणि महागाईमुळे काडीपेटी ही गरिबांसाठी दैनंदिन गरजेची वस्तू नसून एक 'चैनीची' (Privileged) वस्तू बनली.
ज्या घरात काडेपेटी असे, ते घर श्रीमंत मानले जाई. आपली चूल पेटवण्यासाठी गृहिणींना निखाऱ्यावर आवलंबुन राहावे लागे, त्यामुळे गृहिणी काड्यांचा वापर जपून व मर्यादित करत काडेपेटी वापरणे हे तिच्या किंमती व उपलब्धतेमुळे 'प्रिव्हिलेज' (Privilege) होते.
यासंदर्भात आदरणीय लेखक ना.रा.बामणगांवकर यांनी लिहलेल्या पुण्यश्लोक वारद या पुस्तकात दोन ठिकाणी काडेपेटीच्या संदर्भात उल्लेख आले आहेत ते खालीलप्रमाणे
हा संदर्भ पुण्यश्लोक आप्पासाहेबांच्या घराण्यात समाजसेवक किती खोलवर रूजली होती हे दिसुन येते त्याबरोबरच आग्नीप्रज्वलन कठीण असल्याने तो शेजारच्या पाजार्यांना देणे हे शेजारधर्माचे प्रतिक होते.
याच पुस्तकातील दुसरा संदर्भ हा किंमतींच्या संदर्भातील आहे तो खालीलप्रमाणे.
संदर्भ क्रमांक -2
भारतीय काडेपेटीच्या बाजारपेठेवर जपान आणि युरोपियन देशांचा पूर्ण ताबा होता. त्यांच्या मनमानी किंमती आणि आयातीचा खर्च यामुळे भारतीय उद्योजकांना या क्षेत्रात उतरणे कठीण होते. मुख्य अडचण होती ती कच्च्या मालाची, म्हणजेच योग्य लाकडाची या समस्येवर उपाय म्हणून पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी देशांतर्गत उत्पादनाचे प्रयोग सुरू केले त्यासंदर्भातील एका प्रयोगाची व त्याच्या यशाची बातमी विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात छापून आली जो प्रयोग सोलापूर येथे करण्यात आला व त्यात यशही मिळाल्याची नोंद बातमीत करण्यात आली आहे.
सोलापूरचा ( 'गवताचा' ) ऐतिहासिक प्रयोग
जेव्हा आपला संपूर्ण देश काडिपेटीसाठी योग्य लाकडाच्या शोधात होता, तेव्हा सोलापूरच्या भौगोलिक परिस्थितीने आणि येथील उद्योजकांच्या कल्पकतेने एक वेगळा मार्ग शोधला. सोलापूर हे तसं उष्ण आणि कोरड्या हवामानाचे शहर इथे युरोपसारखं मऊ लाकूड मिळणं अशक्य होतं. पण यावर उपाय म्हणून एका ब्रिटीश फॉक्टीरीने एक अफलातून शक्कल लढवली. सोलापूरच्या माळावर आणि पडीक जमिनीत उगवणारं एक विशिष्ट प्रकारचं 'ताठ गवत' (Stiff Native Grass) त्यांच्या नजरेस पडलं. स्थानिकांनी लाकडाऐवजी या गवताचा वापर करायचे ठरवले. गवताच्या काड्यांना कडकपणा यावा आणि त्या व्यवस्थित पेट घ्याव्यात, म्हणून त्यावर 'पॅराफिन' (मेणाचे) चे आवरण चढवण्यात आले.
या प्रक्रियेतून तयार झालेली काडेपेटी लाकडाच्या पेटीपेक्षा कितीतरी स्वस्त बनु लागल्या तत्कालीन बातमीतील नोंदींनुसार, १४४ काडेपेट्यांचा (एक ग्रॉस) बॉक्स अवघ्या २६ सेंट्स ला उपलब्ध झाला.
हि बातमी 18 November 1908 रोजी The jasper News editorial मधे तसेच त्यावेळच्या बर्याच इतर वर्तमानपत्र छापून आली. जिथे साधनसामग्री नव्हती, तिथे 'टाकाऊतून टिकाऊ' निर्मिती करून सोलापूरने उद्योजगतेचा एक नवा धडा घालून दिला. सोलापूरच्या या प्रयोगाची चर्चा त्याकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली होती.
पुढे 1910 साली जपानमधुन एक कुटुंब कलकत्ता येथे स्थायिक झाले व तिथे त्यांनी या आगकाड्यांची निर्मिती सुरू केली तिथुन शिकुन पुढे आनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी उत्पादने सुरू केली पण ती अगदीच लहान व प्राथमिक स्वरुपाची होती.
भारतात या उद्योगात स्विडिश कंपनी विमको (WIMCO Western India Match Company ) ही सेफ्टी माचिसचे यांत्रिकीकरण आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणारी पहिली कंपनी होती,
जिने १९२४ मध्ये आपले कामकाज सुरू केले.
अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावरील काडेपेटी व्यापारावर या कंपनीचा एकाधिकार होता.
कंपनीच्या भारतात, विशेषतः कोलकात्यात असलेल्या अस्तित्वामुळे स्थानिक उद्योगाची स्थापना झाली.
१९२२ मध्ये, विमकोचे दोन माजी कामगार, अय्या नाडर आणि षण्मुगा नाडर यांनी कंपनी सोडून तमिळनाडूतील शिवकाशी येथे हाताने काडेपेटी बनवण्याचे (मॅन्युअल) पहिले कारखाने सुरू केले. पुढे हे ठिकाण काडेपेटी उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले या सर्व घटनेला स्वदेशी चळवळीची किनार होती.
शिवकाशीचे कोरडे हवामान या उद्योगाला पोषक ठरले आणि आज शिवकाशी हे भारताचे 'फटाका आणि कडिपेटिच्या निर्मिती चे एक प्रमुख केंद्र बनले आहे. पण याची बीजे कुठेतरी सोलापूरसारख्या प्रयोगांतही दडलेली होती.
काडेपेटीचा इतिहास फक्त आगीपुरता मर्यादित नाही, तर तो कलेचा आणि क्रांतीचाही आहे. काडेपेटीच्या वरचे ते छोटेसे चित्र (Label) त्याकाळी राष्ट्रीय चळवळीच्या जाहिरातीचे आणि प्रचाराचे मोठे माध्यम बनले होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या कव्हरवर भारतमाता, गांधीजी, सुभाषचंद्र बोस आणि इतर नेत्यांची चित्रे छापून राष्ट्रीय भावना जागृत केल्या जात.
याबरोबरच राजा रविवर्मा यांची पेंटिंग्ज असोत किंवा जुन्या सिनेमांच्या जाहिराती, पक्षी ,प्राणी ,फुले यांच्या विविध रंगीत व आकर्षक चित्रांनी काडेपेटीच्या कव्हरचा कॉव्हस प्रमाणे उपयोग करून भारतीय परंपरा व संस्कृती चे दर्शन घडवले तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या प्रचाराला हातभार लावला.
या सचित्र काडेपेटींचा संग्रह पुढे खुप जणांनी केला व हा इतिहास जपला आहे.
आज जरी काडेपेटी एक क्षुल्लक गोष्ट वाटत असली तरी तिच्या निर्मितीचा प्रवासाचा इतिहास प्रचंड मोठा व रंजक आहे व यात सोलापूरचेही नाव जोडले जाणे अभिमानास्पद आहे.
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी.©
#solapurtales.
Comments
Post a Comment