१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories

 

Sir George Clarke Governor of Bombay

                  (Sir George Clarke Governor )

सोलापूर समाचार

ता. ९ माहे जुलई सन १९१०

ना० गव्हरनर साहेब यांचे आगमन

पूर्वी ठरल्याप्रमाणें मुंबई इलाख्याचे नामदार गव्हरनर साहेबांची स्वारी सोलापुरास शनिवारी सकाळी मेलनें आली होती. त्यांचे स्वागतार्थ स्टेशनावर मुख्य सरकारी अधिकारी, म्यु. कौन्सिलर्स, डि. लो. बोर्डाचे मेंबर्स, श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी व गांवातील काही मंडळी गेली होती. स्टेशन प्लाटफार्म झाडांच्या कुंड्या व निशाणें वगैरेंनी सुशोभित केला होता. गाडी स्टेशनावर आल्याबरोबर मे. कलेक्टर साहेबांनी सामोरे होऊन     ना. साहेबांस उतरून घेतले. श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी महाराज, मे.जज्ज साहेब, हुजूर डे. कलेक्टर, डि. डे. कलेक्टर, मिलिटरी पेन्शनर्स व शेट नरोत्तमदास, रा. ब. साठे वगैरे लोकांच्या मुलाखती करविल्या. स्टेशनच्या बाहेर पोलिसांची सलामी घेऊन स्वारी मे. कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे गेली.

त्याच दिवशी सकाळी ११ वाजतां रिपनहॉलमध्ये ना. गव्हरनर साहेबांस म्युनिसिपालिटीकडून मानपत्र देण्यांत आलें. रिपनहॉलच्या गेटवर भव्य कमान उभारली होती व त्यावर स्वागतपर वाक्य लिहिले होतें. रिपनहॉल प. तोरणांनी शृंगारिला होता व मुख्य दरवाजाचे समोर मध्यभागी नामदार साहेबांकरितां उच्च आसन मांडले होते व दोन्ही बाजूस निमंत्रित मंडळीच्या खुर्च्या नंबरवारीने मांडलेल्या होत्या. नामदार साहेबांची स्वारी आल्याबरोबर सर्वांनी खडी ताजीम दिली.

श्रीसिद्धेश्वर व किल्ला दर्शन:

नंतर नामदार साहेबांची स्वारी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवालय पाहण्यास गेली. तेथें नामदारांनी श्री सिद्धेश्वर व तलावाची माहिती पंचाकडून घेतली व बाजूचे दरवाजांतून देव पाहिला. श्रीसिद्धेश्वराच्या पुजाऱ्यांनी   मे. कलेक्टर साहेबांस व नामदार साहेबांस श्रीफलाचा प्रसाद दिला व पंचांनी पुष्पहार घातला. श्रीसिद्धेश्वराचे रम्य देवालय, तलाव व पंचाची टापटीप पाहून नामदार खुष झाले. नंतर नामदार किल्ला पाहण्यास गेले. किल्यांतील महांकाळेश्वर व बाळंतिणीचा बुरुज पाहिला. महांकाळेश्वर बुरुज बांधतांना त्यांत येथील जोशाचे घराण्यांतला एक ब्रह्मचारी मुलगा बळी दिला व त्याबदल त्यांच्या वंशाला येथील जोशीपणाची वृत्ति मिळाली वगैरे माहिती घेतली. तसेच बाळंतिणीचा बुरुज बांधतांना दर्गापाटील घराण्यांतील एक बाळंतीण चा बळी द्यावा लागला म्हणून त्या घराण्यास बुरुज, बाबु व बेगम या तीन पेठेची सनद त्यांचे वंशास मिळाली. या दोन्ही घराण्यांतील वंशज नामदार साहेबांस दाखविण्यात आले. नंतर तेथून नामदार हे किल्लेवेस व पाणी वेस व विक्टोरिया मार्केट या रस्त्यानें मे. कलेक्टर साहेब यांचे बंगल्यावर गेले.

विष्णुमिलची सुरुवात:

सायंकाळी ५ वाजतां नामदार साहेब विष्णू मिलची सुरवात करण्यास गेले. समारंभ बराच थाटाचा झाला. गिरणीची सुरवात झाल्यावर सदर गिरणीचे कंत्राटदार मि. हाजी हजरतखां यांस मानाचा आहेर, सोन्याचे घड्याळ व हिन्याची आंगठी देण्यांत आली. उपहार व पानसुपारी झाल्यावर तो समारंभ आटोपला.

इव्हिनींग पार्टी:

रात्रौ १०॥ वाजतां रिपन हॉल सोशल क्लबकडून नामदार साहेबांस इव्हिनिंग पार्टी देण्यांत आली. मे. कलेक्टर साहेबांच्या बंगल्यापासून ते रिपनहॉल पर्यंत रस्त्यावर किटसनलाईट व दिव्यांची झाडें वगैरे दीपोत्सव पाहण्यासारखा केला होता. रिपन हॉलच्या बाहेर व बगीच्यांत, श्रीसिद्धेश्वर देवालय व किल्ला आणि तलावाच्या घाट यांजवर बरीच रोषनाई केली होती. मंडळीच्या करमणुकीसाठी फिडल व बीन वाजविणारे आणले होते त्यांनी युरोपियन व नेटिव मंडळीस बरेंच खूष करून सोडलें, मध्यें मध्यें ग्राफोफोनमधील गायनही ऐकावयास मिळत असे.

बगीच्यांत दारुकामाची व्यवस्था करण्यांत आली होती. दारुकाम मि. अबदुलसाहेब फरीदसाहेब यांनी तयार केलेलें होतें. औट गोळे, बाण, झाडें, पाण्याचे मासे, बेडकुळ्या वगैरे दारूचे काम पाहण्यासारखे होते.

रविवार व सोमवारचा कार्यक्रम:

रविवारी पाण्याची गिरणी, हिप्परग्याचा तलाव, लेपर असायलम, मिशन स्कूल वगैरे पाहण्यास नामदारांची स्वारी गेली होती.

सोमवारी सकाळी १० वाजतां श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी महाराज यांच्या मोटार मध्ये नामदार साहेबांची स्वारी नरसिंगगिरजी मिल मध्ये गेली होती. तेथें तयार होणारें सूत, कापड वगैरे सर्व एके ठिकाणी ठेवण्यांत आले होते. माल व गिरणीची सुंदर इमारत पाहून नामदार साहेब फार खुष झाले. नामदार साहेब श्री. राजेबहादर नरसिंगगिरजी महाराज यांजबरोबर मोठ्या आनंदाने बोलत होते. पुष्पहार व अत्तर गुलाब झाल्यावर स्वारी तेथून जुन्या गिरणीमध्ये गेली, तेथेही तयार होणारा माल पाहिला.

नंतर पोलिस लाईन, डफरिन हॉस्पिटल, हायस्कूल, विव्हर्स गिल्ड वगैरे पाहण्यांत आल्या. स्वारी काल सायंकाळच्या मेलनें पुण्यास गेली. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत पोलिस बंदोबस्त फारच उत्तम होता.

संदर्भ - सोलापूर समाचार अंक

आभार - हि.ने.वाचनालय सोलापूर

संकलन /भाषांतर

अतुल देशपांडे

सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)