भिमरावांचा संप १९२०

भिमरावांचा संप १९२०
( सोलापूरातील महान कामगार नेत्याचा विस्मृतीत गेलेला इतिहास )
हि घटना १९२० सालची. त्यावेळी सोलापूर हे कापड उद्योगाचं एक खूप मोठं केंद्र होतं, पण तिथल्या कामगारांची परिस्थिती खूपच वाईट होती. गिरणी मालक प्रचंड नफा कमावत होते (एका गिरणीने तर ८ लाखांच्या भांडवलावर ३ कोटींचा नफा कमावला होता, पण कामगारांना मात्र 12 ते 14 तास काम करुनही अतिशय तुटपुंजा पगार मिळत होता. या अन्यायाविरुद्ध कामगारांच्या मनात असंतोष धुमसत होता आणि याच असंतोषातून एका मोठ्या संपाचा जन्म झाला, ज्याचं नेतृत्व भीमराव नावाच्या एका धाडसी कामगार नेत्याने केलं.
 त्या वेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मधे मुंबई आणि अहमदाबादच्या गिरण्यांच्या तुलनेत सोलापूरच्या कामगारांचा पगार खूपच कमी होता. 
पहिल्या महायुद्धानंतर महागाई प्रचंड वाढली होती परंतु पगारवाढ मात्र होत नव्हती अशा परस्थितीला हातभार म्हणून सोलापूर मधील गिरण्यांनमधे दुहेरी खाडा पध्दत अस्तित्वात होती यामधे जर कामावर एक दिवस गैरहजर राहिल्यास दोन दिवसांचा पगार कापला जायचा. याला "दुहेरी खडा पद्धत" म्हणत. यामुळे कामगारांचं मोठं आर्थिक नुकसान होत असे  याच बरोबर किरकोळ चुकांसाठी मोठा दंड, कामावरून काढून टाकण्याची धमकी आणि ज्वारी-डाळीसारख्या सवलती बंद करण्याची भीती सतत असायची. ( त्यावेळी गिरण्यांनमधे रेशनिंग वर सवलतीच्या दरात धान्य देण्याची पध्दत होती )
मुंबईत झालेल्या यशस्वी गिरणी संपामुळे सोलापूरच्या कामगारांनाही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढायचं ठरवलं.

२६ जानेवारी १९२० रोजी भीमरावांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी एकजुटीने संप पुकारला. सुरुवातीला संप अगदी शांततेत सुरू होता. प्रकरण मिटवण्यासाठी एक समिती नेमण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण इथेच खरी मेख होती. पहिल्यांदा कलेक्टरच्या मर्जीतील माणसं, जसे की माणिकचंद शहा आणि मिस्टर स्ट्रटन, यांनी एक समिती बनवली. पण कामगारांना या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता, कारण ते मालक आणि कलेक्टरच्या बाजूचे होते. त्यामुळे कामगारांनी ही समिती धुडकावून लावली आणि ती पहिल्याच दिवशी बारगळली यानंतर, २८ जानेवारी रोजी कामगारांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली समिती निवडली. यात व्ही. एन. साठ्ये ( निवृत्त डेप्युटी कलेक्टर) आणि सामंत वकिल यांसारख्या विश्वासू लोकांचा समावेश होता. ही समिती तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न करत होती. पण तत्कालीन कलेक्टर मिस्टर सिमकोक्स याला हे मान्य नव्हतं. त्याने सतत हस्तक्षेप करून, आपल्या माणसांना समितीमधून बाहेर काढून या दुसऱ्या समितीलाही काम करू दिलं नाही. कलेक्टरच्या या आडमुठेपणामुळे वाटाघाटीचे सर्व मार्ग बंद झाले जेव्हा स्थानिक पातळीवर काहीच होईना, तेव्हा कामगारांनी आपले प्रतिनिधी मुंबईतील कामगार नेते जोसेफ बॅप्टिस्टा यांच्याकडे पाठवले. बॅप्टिस्टांनी त्यांना गिरणी मालक शेठ नरोत्तम मोरारजी यांच्याकडे पाठवलं. पण तिथे कामगारांचा मोठा अपमान झाला. शेठ नरोत्तम यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, त्यांना 'तुम्ही बेईमान आहात' म्हणून कामगार नेत्यांचा आपमान केला तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि हाकलून लावलं.
ही बातमी सोलापुरात पोहोचताच कामगारांचा संताप अनावर झाला. स्थानिक पातळीवर न्याय मिळत नाही आणि मालकही ऐकत नाहीत, हे पाहून जोसेफ बॅप्टिस्टा यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी कामगारांना पत्र लिहून कळवलं की, या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी ते स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनंती करणार आहेत की त्यांनी काही विश्वासू माणसं सोलापूरला पाठवावीत. लोकमान्य टिळकांसारख्या मोठ्या नेत्याचं नाव यात आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं.
मुंबईतील नेत्यांच्या मध्यस्थीला हि यश आले नाही व कामगारांचे प्रतिनिधी सोलापूर ला परतले हि बातमी समजल्यानंतर कामगारांन मधे अधिकच असंतोष पसरला.
१६ फेब्रुवारी १९२०. कामगार आपला जानेवारी महिन्याचा थकलेला पगार घेण्यासाठी शांततेने गिरण्यांकडे निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना लष्कराने अडवलं. कलेक्टर सिमकोक्स स्वतः तिथे हजर होता प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सिमकोक्सने कामगारांचे नेते भीमराव यांना पुढे बोलावून घेतलं आणि जमाव नियंत्रणात नसल्याचं कारण देत त्यांना दोन-चार ठोसे लगावले. आपल्या नेत्याचा हा अपमान पाहून जमाव संतप्त झाला आणि काही मुलांनी दगडफेक केली हे एक निमित्तच ठरलं. कलेक्टर सिमकोक्सने कोणताही विचार न करता सैन्याला गोळीबाराचा आदेश दिला. आधी हवेत गोळीबार झाला, पण त्यानंतर थेट जमावावर गोळ्या झाडण्यात आल्या. या निर्दयी गोळीबारात सहा कामगार ठार झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. शहरात हाहाकार माजला आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर सोलापूरची जनता कलेक्टर सिमकोक्सवर प्रचंड चिडली. लोकांनी त्याच्या बदलीची आणि या संपूर्ण प्रकरणाच्या निःपक्षपाती चौकशीची मागणी केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लोकांचा राग पोलिसांवर (विशेषतः पोलीस अधीक्षक मिस्टर एलिस यांच्यावर, जे लोकप्रिय होते) किंवा लष्करावर नव्हता, तर फक्त आणि फक्त कलेक्टर सिमकोक्सच्या घाईच्या आणि अन्यायकारक निर्णयावर होता.
संप काही काळानंतर मागे घेण्यात आला, पण वातावरण तंगच होतं. मार्च महिन्यात कामगारांनी पुन्हा एकदा गिरणीत जाऊन काम न करता आंदोलन सुरू केलं. अखेरीस, २० मार्च १९२० रोजी मालकांनी टाळेबंदी जाहीर केली आणि संप मोडून काढला.
या लढ्यात कामगारांच्या पदरी अपयश आलं. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतच, उलट त्यांचे नेते भीमराव आणि इतर १२ प्रमुख कामगारांची नावं काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात आली,व त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले ज्यामुळे त्यांना पुन्हा नोकरी मिळणं अशक्य झालं.
भीमरावांच्या नेतृत्वाखालील हा संप जरी अयशस्वी ठरला असला, तरी भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासात तो एका रक्तरंजित आणि महत्त्वपूर्ण अध्यायाच्या रूपात नोंदवला गेला. 
सोलापूर मधील गिरणी कामगार चळवळ या आपल्या पुस्तकात डॉ. चंद्रकांत चव्हाण सर लिहतात अत्यंत संयमाने येथील कामगार नेत्यांनी संप चालविला. 'झाडपाला खा पण संप टिकवा' असे सांगणारा भीमराव कोणतेही तत्त्वज्ञान पिलेला नव्हते. तो ना मार्क्सवादी होता ना लेनिनवादी. परंतु तरीही त्याने ६ महिने ४० दिवस संप घडवून आणला. हा भीमराव कोण होते याची इतिहासकारांना माहिती नाही. सोलापूरच्या कामगारांना पहिला ज्ञात कामगार नेता असणाऱ्या भीमरावाने जो संप घडवून आणला त्याची तीव्रता इतकी होती की सोलापूरच्या इतिहासात ब्रिटिशांना पहिल्यांदा या संपावेळी लष्कर सोलापुरात पाचारण करावे लागले. 
जसे भीमरावाचे पूर्वआयुष्य अज्ञात आहे, त्याचे पूर्ण नावही जिथे ज्ञात नाही तिथे त्याच्या उत्तर आयुष्याचीही माहिती प्राप्त होत नाही. ( संदर्भ – डॉ चंद्रकांत चव्हाण सरांचे सोलापूरातील गिरणी कामगार चळवळ)
हा संप बारगळल्यानंतर येथील गिरणीमालकांनी संपाचे नेतृत्व करणाऱ्या १३ कामगार पुढाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे या कामगार नेत्यांची भीमराव, चाँद अप्पाभाई व त्यांचे सहकारी यांची फार मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली. भीमरावास त्यामुळे सोलापूर सोडावे लागले असले तरी त्यांनी आपल्या कार्याने सोलापूरच्या कामगार चळवळीच्या इतिहासात आपले नाव
या संपाचा तपशीलव कॉ मिनाक्षी साने यांचे सोलापूरचा गिरणी कामगार तसेच डॉ चंद्रकांत चव्हाण यांचे सोलापूर मधील कामगार चळवणीचा इतिहास तसेच A.R देसाई लिखित labour movement in india या पुस्तकात आला आहे परंतु या मधे भिमरावांचे पुर्ण नाव अथवा त्यांचे पुढे काय झाले हे माहीत नव्हते .
मी सोलापूर इतिहासा विषयी अभ्यास करताना मला भिमरावांनबद्दल चे नाव व ते पुढे कुठे गेले याविषयी माहिती निदर्शनास आली मी ती चव्हाण सरांना दाखवली त्यांना प्रचंड आनंद झाला त्यांनी माझे कौतुक केले व याबाबत आजच्या दिव्य मराठीत याविषयीचा माहिती देणारा लेख आजच्या 
दैनिक दिव्य मराठी मधे लिहला आहे त्याबद्दल 
सोलापूर मधील इतिहासकार डॉ. चंद्रकांत चव्हाण सरांचे विशेष आभार.
पूर्वाध समाप्त.
( भिमरावांची आधीकची माहिती व त्या संदर्भातील अस्सल कागदपत्रे पुढील लेखात )
क्रमशः 
अतुल देशपांडे
atul26deshpande@gmail.com #solapurtales

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories