Just Boy's in सोलापूर 1917
एकदा मुलांच्या सभेत मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला.
"ज्यांना वाटतं की आपण तायाला रात्रभर अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवावं आणि आज संध्याकाळी त्याला फटाक्यांची आतषबाजी बघायला जाऊ देऊ नये, त्यांनी हात वर करा!"
प्रश्न होता ताया नावाच्या एका तेरा वर्षांच्या मुलाचा. तो वारंवार शाळेचे नियम मोडून शहरात पळून जायचा आणि शाळा बुडवायचा. तो तुलनेने नवीन होता, म्हणून अधीक्षकांचा (Superintendent) कल त्याला माफ करण्याकडे होता, पण त्याला अनेकदा ताकीदही दिली गेली होती .अखेर अधीक्षकांनी ठरवले की यावर सर्वात चांगला निर्णय तायाचे सोबती, म्हणजेच बोर्डिंगमधली इतर मुलंच घेऊ शकतील. प्रकरण त्यांच्यासमोर मांडण्यात आलं. सभेत बरीच चर्चा झाली, काहींनी बाजू घेतली, काहींनी विरोध केला.
जेव्हा मतदानाची वेळ आली, तेव्हा ताया रडायला लागला आणि दयेची भीक मागू लागला. तेवढ्यात, एका मोठ्या मुलाने उभे राहून एक वेगळाच प्रस्ताव मांडला. तो म्हणाला, "बाकीची मुलं आतषबाजी पाहायला जातील, तेव्हा मी तायासोबत राहीन. मी त्याला माझ्या ताब्यात ठेवीन."
हा एक दयाळू पर्याय होता. लगेच हा प्रस्ताव मांडला गेला आणि मुलांचं मत बदललं. पहिला, शिक्षेचा प्रस्ताव फेटाळला गेला आणि या नवीन प्रस्तावाला मोठं बहुमत मिळालं. यावरून एकच सिद्ध होतं - मुलांनाच कळतं मुलांना कसं हाताळायचं!
ही मुलं येतात तरी कुठून?
सोलापूरच्या या बॉईज स्कूलच्या बोर्डिंग विभागात (निवासी शाळा) अशी सुमारे पंचाहत्तर मुलं आहेत. कुणी सात-आठ वर्षांचं, तर कुणी अगदी वीस वर्षांचं. यातली लहान मुलं किंडरगार्टनमध्ये जातात, तर मोठी मुलं मिशनच्या स्थानिक भाषेतील (Vernacular) आणि इंग्रजी-मिश्रित (Anglo-Vernacular) शाळांमध्ये शिकतात. काहीजण तर म्युनिसिपल हायस्कूलमध्ये जाण्यासाठी, त्याची फी भरता यावी म्हणून दिवसभर सुतारकाम कार्यशाळेत काम करतात.
ही सगळी 'मिशनची मुलं' आहेत. काही मिशनला वारशाने मिळाली आहेत, काहींना दत्तक घेतलेलं आहे. काही चांगल्या घरातून आलेली, तर काही अशी ज्यांना घरच नाही. यात अशीही काही मुलं आहेत ज्यांना त्यांच्या पालकांना सांभाळणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी कायमचा हक्क सोडून त्यांना मिशनच्या ताब्यात दिलं. यात कुष्ठरोग आश्रमातील निरोगी मुलांचाही एक गट यात आहे.
'भावी राष्ट्राध्यक्ष' आणि 'सापडलेला हिरा'
असाच एकदा 'सॅम्युअल' नावाचा एक मुलगा आला. तो बेने इस्त्रायली (ज्यू वंशाचा) होता. आला तेव्हा तो फक्त बारा वर्षांचा होता आणि घरापासून पहिल्यांदाच दूर आल्याने स्टेशनवर त्याला घ्यायला गेलेल्या मुलांसमोर ढसढसा रडला.
दोन दिवसांनी त्याच्या वडिलांचं एक भन्नाट पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं: "माझा एकुलता एक मुलगा, माझं रत्न, मी तुमच्याकडे सर्वोत्तम ख्रिश्चन प्रशिक्षणासाठी पाठवत आहे. तुम्ही फक्त त्याची हुशारी ओळखा. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड किंवा अब्राहम लिंकन यांच्यासारखा होऊ शकतो!"
अधीक्षकाला वाटलं, ही तर नवीनच प्रेरणा मिळाली! अमेरिकेसाठी भावी अध्यक्ष घडवण्यासाठी आपण परदेशात आलो आहोत की काय! गंमत म्हणजे, हा 'भावी राष्ट्राध्यक्ष' (फोटोत उभा असलेला) आला तेव्हा पहिल्या इयत्तेत होता... आणि पाच महिन्यांनंतरही त्याच इयत्तेत होता!
पण 'नारायण'ची (फोटोत पगडी घालून बसलेला) गोष्टच वेगळी. हा मुलगा तर योगायोगाने सापडला!
तो त्याच्या काकासोबत मुंबईला जात होता. पण सोलापूर स्टेशनवर ट्रेन थांबली असताना दोघे खाली उतरले आणि काका गायब झाला. ट्रेन निघून गेली. बारा वर्षांचा नारायण एकटाच प्लॅटफॉर्मवर राहिला. मिशनच्या एका नोकराने त्याला ओळखलं आणि कंपाऊंडमध्ये आणलं.
हा मुलगा कमालीचा हुशार आणि आकर्षक होता. त्याला कन्नड आणि थोडं इंग्रजीही यायचं. पण मराठी अक्षरओळख नसल्याने त्यालाही पहिल्या इयत्तेत बसावं लागलं. हा मुलगा इतका शिष्टाचारी होता की बोर्डिंगमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या मुलांनाही लाजवेल. एकदा एका पार्टीत त्याने स्वतःहून सगळ्यांना चहा आणि बिस्किटे वाटली पण नंतर कळलं की हा गुणी मुलगा लपून-छपून बिड्या ओढायचा! चला, म्हणजे तो काही अगदीच 'साळसूद' (goody-goody) नव्हता!
( नारायण आणि अमेरिकेचा भावी राष्ट्राध्यक्ष)
अभ्यास, काम आणि खेळ
या मुलांचा दिवस ठरलेला असतो. सकाळी सात वाजता दोन-दोनच्या रांगेत चालत अर्धा मैल दूर असलेल्या शाळेत जायचं. तिथे साडेअकरापर्यंत वाचन, लेखन, अंकगणित, भूगोल असा अभ्यास. मग कंपाऊंडमधल्या मोठ्या झाडाखाली दुपारचं जेवण.
एक वाजता सगळी मुलं 'कारखान्यात' जातात.
हा कारखाना म्हणजे सुतारकाम, विणकाम आणि शिलाईची कार्यशाळा. लहान मुलं शिलाई किंवा विणकाम करतात. त्यांच्याकडे सात खिळखिळ्या झालेल्या लाकडी माग (Loom) आहेत, ज्यांना जवळजवळ रोज दुरुस्ती लागते. पण इन्स्पेक्टर म्हणतात, "चांगलं आहे! म्हणजे उद्या गावात स्वतःचा माग बिघडला, तर यांना तो दुरुस्त करता येईल."
मोठी आणि मजबूत मुलं सुतारकाम शिकतात. ही मुलं इतकी तयार झाली की त्यांनी एकदा दुसऱ्या शाळेसाठी डंबेल्सच्या अठरा जोड्या बनवल्या होत्या. इतकंच काय, त्यांनी टेबल, खुर्च्या, कपाटे आणि एकदा तर शवपेटी (Coffin) सुद्धा बनवली होती! आणि तो आपला स्टेशनवर सापडलेला नारायण? तो या सुतारकामात भलताच तरबेज निघाला. त्याने अवजारे अशी काही सफाईने हाताळायला सुरुवात केली, जणू तो हेच काम करत मोठा झालाय!
गाणं, संगीत आणि प्रार्थना
अभ्यास आणि काम झालं, मग खेळ! गुरुवारी दुपारी प्रार्थनासभा असते, पण बाकीच्या दिवशी क्रिकेट, पकडापकडी आणि अर्थातच, आट्यापाट्या! आट्यापाट्या हा एक भारतीय खेळ आहे ज्यासाठी कमालीची चपळाई लागते. मुलांना क्रिकेटचंही भयंकर वेड आहे.
पण या मुलांचा खरा जीव असतो संगीतात. ढोल हे त्यांचं मुख्य वाद्य. कीर्तन असलं की लहान पोरंसुद्धा ढोलाच्या तालावर स्वतःच्या छातीवर बोटं वाजवत बसतात. भारतीय मुलगा गाण्यासाठी लाजत नाही. रविवारी तर दिवसभर गाणं चालतं - संडे स्कूलमध्ये, चर्चमध्ये, आणि मग संध्याकाळी जेवण आटोपल्यावर झोपण्याआधी दोन तास एका गरीब तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात बसून गाण्याचा कार्यक्रम ठरलेला!
मुलांना चर्चला जायचा कंटाळा येत नाही, कारण तिथले स्थानिक पास्टर (धर्मगुरू) मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत, उदाहरणे देत प्रवचन देतात. ते मुलांना हसवतात, त्यामुळे तो तास मनोरंजक होतो. एकदा तर १३ वर्षांच्या मुला-मुलींनी प्रार्थना सभेत स्वतःहून उभं राहून उत्स्फूर्तपणे प्रार्थना म्हटल्या, हे बघून सगळेच थक्क झाले होते.
पुढे काय?
पण ही मुलं मोठी झाल्यावर काय? अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेतून थोडं इंग्रजी शिकल्यावर त्यांना आणखी शिकायचं असतं. त्यांना म्युनिसिपल हायस्कूलमध्ये जायचं असतं, कारण तिथे गेलं तरच 'साहेबा'कडे किंवा सरकारात चांगली नोकरी मिळणार.
पण अडचण पैशांची होती. मिशनकडे सगळ्यांना हायस्कूलला पाठवायला निधी नसायचा.
मिशनला स्वतःच्या शाळांसाठी शिक्षकांची गरज होती. त्यामुळे ते मुलांना अहमदनगरच्या नॉर्मल स्कूलमध्ये (शिक्षक प्रशिक्षण शाळा) जायला प्रोत्साहन द्यायचे. पण तिथे गेलं की इंग्रजी शिक्षण थांबायचं, जे मुलांना नको असायचं.
त्यामुळे काहीजण नाइलाजाने नॉर्मल स्कूलला जायचे असते.तर काहींना सोलापूरच्या कापड गिरण्यांमध्ये, रेल्वेमध्ये किंवा पुण्याला छापखान्यात नोकरी शोधावी लागेल.
(फोटोत दिसणारी चार हुशार मुलं त्याच बॅचची)
शेवटी, मुलं ती मुलंच!
लेखक (रेव्ह. गेट्स) शेवटी म्हणतात, "मुलं ती मुलंच असतात (Boys will be boys)," तुम्ही त्यांना टॉम, डिक, हॅरी म्हणा किंवा ताया, दिनकर, हरी म्हणा. अमेरिकेतला रिचर्ड जशी मुलींची वेणी ओढतो, तसाच भारतातला रतनही ओढतो. अमेरिकेतला बॉब जशी बॅट फिरवतो, तसाच भारतातला भाऊही (Bhau) फिरवतो. 'दुगाडू' नावाचा एक मुलगा तर इतका अभ्यासू आहे की तो पहाटे उठून अभ्यास करण्यासाठी मित्रांसोबत वेगळ्या खोलीची मागणी करतो.
तर दुसरीकडे, तोच आपला 'भावी राष्ट्राध्यक्ष' सॅम्युअल, कामातून पळ काढण्यात एक नंबर आहे!
अमेरिकेतल्या मुलांसारखीच ही मुलं हुशार ,खोडकर, आळशी आणि दादागिरी करणारी आहेत, पण एक गोष्ट नक्की, भारतीय मुलांसारखी विनम्र आणि सभ्य मुलं दुसरीकडे सापडणं कठीण आहे.
फरक इतकाच आहे की, भारतातील मुलांना अमेरिकन मुलांना मिळणाऱ्या संधीच्या 'निम्म्या संधी' (half a chance) सुद्धा मिळत नाहीत. आशा करूया की एक दिवस त्यांना त्या नक्की मिळतील.
(Rev. Henry gates यांच्या just boys in Sholapur 1917 या पुस्तकातील solapur boys school)
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे.
#solapurtales
Comments
Post a Comment