सोलापूर च्या गारुड्याची मुलाखत -1896

सोलापूरचे गारुडी सय्यद जमाल यांची १८९६ सालातील 'द स्ट्रँड मॅगझिन' मधील मुलाखत
(भारतात कायद्याव्दारे बंदी येईपर्यंत  गारुडी उपजिविकेसाठी करत असलेले सापांचे खेळ काही नवीन नाहीत परंतु असा खेळ करणार्यां सोलापूरच्या  एका गारुड्याची मुलाखत 1896 साली थेट लंडन मधील मसिकात फोटोसहीत छापण्यात आली.  
सोलापूरच्या इतिहास आणि आठवणींच्या संदर्भात हि एक अत्यंत दुर्मिळ व जुनी मुलाखत आहे म्हणून तिची नोंद घेणे आवश्यक वाटते.)
हि मुलाखत १८९६ साली  'द स्ट्रँड मॅगझिन' (The Strand Magazine) या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाली. जॉर्ज न्यूनेस (George Newnes) यांनी संपादित केलेले हे सचित्र मासिक लंडन येथून प्रकाशित होत होते. या मासिकाच्या 'जानेवारी ते जून १८९६' च्या अंकात 'सम पेक्युलिअर एन्टरटेन्मेंट्स' (Some Peculiar Entertainments) अर्थात,
'अजब मनोरंजनाचे प्रकार' या शिर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखात  सोलापूरचे रहिवासी असलेले गारुडी,
सय्यद जमाल यांच्या मुलाखतीचाही समावेश लेखातील इतर अजब मनोरंजनाच्या प्रकारांनसोबत केला गेला.
सोलापूरचे गारुडी सय्यद जमाल यांची मुलाखत
 (Poona snake charmers) 
मुलाखतकाराने लेखात नोंदवलेला पुढील धोकादायक खेळ म्हणजे पुण्यात त्याने पाहिलेला  सापांचा खेळ.
या खेळाच्या संदर्भात  सोलापूरचे रहिवासी असलेले गारुडी सय्यद जमाल यांची मुलाखत घेण्यात आली आहे, जमाल मुलाखतीवेळी 'तुमडी' (tumri) नावाचे वाद्य वाजवून नागाला नाचवत होते. या जिवघेण्या खेळातील धोक्याबाबत प्रश्न विचारला असता याबाबत जमाल यांचे तत्त्वज्ञान ही सिंह प्रशिक्षक रिकार्डे यांच्यासारखेच होते, त्यांनी त्यांच्या पवित्र ग्रथांचा हावाला देऊन  सांगितले आपल्या हातात काही नाही ( जन्म - मृत्यू)  'प्रत्येक माणसाच्या नशिबाची नोंद जन्मतःच त्याच्या गळ्यावर बांधलेली असते.' 
या खेळाबाबत जमाल यांना आधिक विचारले असता त्यांनी पुढील माहिती दिली,
हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचा शतकानुशतके चालत आलेला एक परंपरागत व्यवसाय आहे.
 या खेळात विविध प्रकारचे पाणसर्प , नाग तसेच अजगर (Pythons)  वापरले जातात.
 मे महिन्यात उष्णतेमुळे जेव्हा साप बिळातून बाहेर येतात, तेव्हा त्यांना पकडले जाते. यासाठी शिकारी टोळया जंगलात , डोंगराळ भागात विशिष्ट प्रकारच्या काठ्या  (forked sticks) घेऊन जातात ज्याव्दारे साप उभा राहिल्यास त्याला खाली पाडण्यात येते. 
सापाला पकडून पिशवीत टाकण्यापूर्वी, कुशल गारुडी तीन बोटांनी (दोन गळ्यावर आणि एक डोक्याच्या मागील बाजूस) सापाला पकडतो आणि पेननाईफने त्याचे दोन्ही विषारी सुळे (poison fangs) काढून टाकतो. या क्रियेला १० ते १५ मिनिटे लागतात. परंतु हे सर्व वाटते तेवढे सोपे नाही सापांचा पकडणे अत्यंत धोकादायक असते, कारण हे विषारी साप किंवा जंगलातील नागांचा डंख केवळ दोन तासांत एका सशक्त माणसाला मारू शकतो. 
सय्यद जमाल यांच्या दुभाष्याने सांगितले की, त्यांनी अनेकांना सापाने चावल्यानंतर मरताना आणि त्यांचे तोंड काळे निळे पडताना पाहिले आहे. 
हे गारुडी तुमडी नावाचे कर्कश वाद्य वाजवतात, त्याबरोबर नाग टोपलीतून डोके वर काढतात. 
त्यांच्या जवळील काही साप आकाराने एकदम लहान पेन्सिल एवढे तर काही खुप मोठे व लांब असतात जे बांबूच्या विणलेल्या टोपल्यात ठेवले जातात. पकडल्यानंतर सापांना काही दिवस उपाशी ठेवले जाते त्यानंतर गारुडी विशिष्ट  लईत पुंगी वाजवतो या हालचालींनी साप टोपलीतन डोके वर उचलतो यानंतर सापांना खायला एक अंडे आणि एक पाईंट दूध दिले जाते.
"पाण्यातल्या सापांना व्हाइटबेटचं खाद्य दिलं जातं, आणि मोठ्या सर्पांना दर पंधरा दिवसांनी कोंबडी चे चिकन दिले जाते. हे सापाचा खेळ दाखवणारे गारुडी जादूगारसुद्धा असतात, कधीकधी ते सापांची खरेदी फकीरांकडूनही  करतात, आणि त्यासाठी १ शिलिंग २ पैसेपासून १ पौंडपर्यंत पैसे मोजतात."
सय्यद जमाल यांनी सांगितले की, ते जन्मतः गरीब  आणि शिक्षणाने मागास असल्यामुळे त्यांना या खेळाव्दारे मिळणाऱ्या कमाईवर अवलंबून राहावे लागते आणि त्यांची सर्व कमाई जवळपास निव्वळ नफा असतो. खेळ पाहणारे लोक पैशाच्या किंवा अन्नाच्या स्वरूपात बक्षीस देतात.
याबाबत जमाल त्यांची एक आठवण सांगतात त्यांना एकदा हैदराबादच्या निजाकडून एका प्रयोगासाठी £२० (वीस पौंड) इतकी रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने आणि जरीचा फेटेही बक्षीस म्हणून मिळाला होता.
सय्यद जमाल यांच्याप्रमाणेच, या लेखात इतरही अनेक विचित्र आणि धोकादायक खेळांचे व ते करत असलेल्या कलाकारांचे वर्णंने करण्यात आली आहेत, 
लेखातील इतर साहसी खेळ खालीलप्रमाणे
प्रोफेसर जेम्स फिने आणि मिस मेरी फिने हे दोघे गरम पाण्याच्या टाकीत पोर्सिलेनचे कार्ड घेऊन 'नॅप' (Nap) हा जुगार खेळत असत. प्रोफेसर फिने यांचे हात बांधलेले असताना, ते तोंडात ७० ते ८० सोन्याचा मुलामा दिलेली नाणी घेऊन चार मिनिटे पाण्याखाली राहिले होते.
 'द ह्युमन ऑस्ट्रिच' (कोळसा आणि काच खाणारा): हा कलाकार दररोज कोळसा, एक जाड काचेचा ग्लास आणि दोन चरबीच्या मेणबत्त्या खात असे.
शेव्हॅलियर क्लिक्कॉट (तलवार गिळणारा): हा फ्रेंच-कॅनेडियन कलाकार २२ इंच लांबीची घोडेस्वारांची तलवार (cavalry sabre) गिळत असे. एकदा तलवार गिळून शरीर वाकवले असता ती वाकली आणि बाहेर काढताना त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती.
रिकार्डे (Ricardo), सिंह प्रशिक्षक: सिंहाच्या पिंजऱ्यातील प्रयोगांदरम्यान रिकार्डे यांनी आपल्या जखमी सहकाऱ्याला सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढले होते. त्यांच्या मते, रस्त्यावर अपघात होऊन मरण्यापेक्षा हा व्यवसाय कमी धोकादायक आहे.
मिस डार्नेट, 'द सिंगिंग स्ट्रॉंग लेडी': ही महिला आपल्या हातांवर आणि पायांवर, चेहरा वर करून झोपायची, तिच्यावर एक फळी ठेवून त्यावर अर्धा टन वजनाचा पियानो आणि स्वतःचा नवरा (पियानो वाजवणारा) बसून गाणे गात असे.
रॅनिन (Rannin), 'द मॅन विथ द आयर्न स्किन': श्रीलंकेचा (Cingalese) असलेला हा कलाकार वस्तऱ्याप्रमाणे तीक्ष्ण तलवारींच्या शिडीवर चालणे, खिळ्यांनी भरलेल्या पलंगावर (spiked bed) झोपून छातीवर अनेक माणसांचे वजन पेलणे असे प्रयोग करत असे.
वॉल्टर वेन्टवर्थ (Walter Wentworth): ७० वर्षांचे असलेले हे सर्वात वयस्कर 'कन्टॉर्शनिस्ट' होते. ते एका लहान पेटीत (२३ इंच लांब), सहा डझन सोडा-वॉटरच्या बाटल्यांसोबत स्वतःला पॅक करून घेत असत.
या सर्वांनबरोबरीने सोलापूरचे गारूडी सय्यद जमाल यांनी स्थान मिळवणे हे सोलापूर चा सन्मान वाढवणारे होते. 
(विशेष सुचना : लेखाचा उद्देश केवळ  ऐतिहासिक वर्णन हा आहे  भारतामध्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (Wildlife (Protection) Act, 1972) या कायद्यानुसार सापांचे खेळ करणे आणि त्यांना पाळणे हा गंभीर गुन्हा आहे.
प्राणी संरक्षणाला प्राधान्य द्या.)
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी
#solapurtales.

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories