'सोलापूर टेंम्परन्स असोसिएशन' (१९०२)

    सोलापूरकरांचा मद्यपानाविरुध्दचा लढा आणि        'सोलापूर टेंम्परन्स असोसिएशन' चा इतिहास
सोलापूरच्या समृद्ध इतिहासात सामाजिक सुधारणांच्या चळवळींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एकीकडे स्वातंत्र्यलढा धुमसत असतानाच, दुसरीकडे समाजाला पोखरणाऱ्या व्यसनाधीनतेविरुद्धही एक मोठा लढा उभारला जात होता या सर्व घडामोडींचा वेध खालील लेखात घेण्यात आला आहे.
टेंपरन्स चळवळीची गरज आणि जागतिक पार्श्वभूमी
१७ व्या शतकापूर्वी जगामध्ये दारूचा वापर अत्यंत मर्यादित होता. मात्र, औद्योगिक क्रांतीनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. मद्यपान हे केवळ एक 'पेय' न राहता, ती एक मोठी सामाजिक समस्या बनली. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक हिंसाचार, आर्थिक दिवाळखोरी आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले. 
या भीषण परिस्थितीवर उपाय म्हणून १८०० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिका आणि युरोपमध्ये 'टेंपरन्स चळवळ' (Temperance Movement) उदयाला आली.
सुरुवातीला या चळवळीचा उद्देश केवळ दारूचे प्रमाण कमी करणे हा होता, परंतु समस्येची तीव्रता पाहून लवकरच 'संपूर्ण दारूबंदी' (Teetotalism) हीच मुख्य मागणी बनली. १८२६ मध्ये स्थापन झालेली 'अमेरिकन टेंपरन्स सोसायटी', १८७४ ची 'वुमन्स ख्रिश्चन टेम्पर्न्स युनियन' (WCTU) आणि 'इंडिपेंडेंट ऑर्डर ऑफ गुड टेम्परन्स' यांसारख्या संघटनांनी याला जागतिक स्वरूप दिले.
      (मद्याला पर्याय म्हणून इतर पेयांच्या जाहिराती                      मासिकात देण्यात आल्या आहेत.)
चळवणीचा भारतातील प्रवेश:
भारतात या चळवळ ब्रिटीशांच्या आगमनानंतर एका विशिष्ट वळणावर प्रवेश केला याचे कारण म्हणजे  ब्रिटीश सरकारचे 'उत्पादन शुल्क धोरण' (Excise Policy) हे प्रामुख्याने महसूल गोळा करण्यावर आधारित होते. महसूल वाढवण्यासाठी ब्रिटीश सरकारने दारूच्या दुकानांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे भारतीय समाजात मद्यपानाचे प्रमाण धोकादायक रितीने वाढले. याचे सर्वाधिक चटके भारतीय महिलांना आणि गरीब कुटुंबांना बसू लागले. याला विरोध म्हणून केशवचंद्र सेन यांसारख्या भारतीय समाजसुधारकांनी आवाज उठवला. तर दुसरीकडे, १८८८ मध्ये विल्यम केन (William Caine) या ब्रिटीश दारूबंदी समर्थक नेत्याच्या नेतृत्वाखाली 'अँग्लो-इंडियन टेंपरन्स असोसिएशन' (Anglo-Indian Temperance Association) ची स्थापना झाली. या चळवळीचे कार्य केवळ भारतातच नव्हे, तर नॉर्वे, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, लंडन, सिलोन (श्रीलंका) अशा अनेक देशांमध्ये पसरलेले होते.
या संस्थेचे लंडनमधील सचिव मि. डब्ल्यू. एस. केन हे भारतातील स्थानिक नेत्यांशी पत्रव्यवहार करून दारूबंदीसाठी प्रोत्साहित करत असत. 'सोल्जर्स टोटल ॲबस्टिनन्स असोसिएशन' आणि इतर स्थानिक संस्थांनीही यात पुढाकार घेतला. देशभरातील प्रमुख शहरांनबरोबर  सोलापूर हे या चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. याचे कारण म्हणजे सोलापूरात नुकत्याच सुरू झालेल्या कापडगिरण्यांनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले गिरणी कामगार व त्यांच्या मधे वाढत चाललेली व्यसनाधीनता.   १९०२ च्या सुमारास असोसिएशनने प्रकाशित केलेल्या 'अबकारी' (Abkari) या त्रैमासिकातील कागदपत्रांवरून सोलापूरच्या या लढ्याचा सविस्तर इतिहास उलगडतो.
सोलापूरमध्ये १८९८ सालापासून 'सोलापूर पीपल्स असोसिएशन'ची एक शाखा म्हणून दारूबंदीचे काम चालत होते. परंतु, १८९८ नंतर सोलापूरला दोन भयंकर दुष्काळांचा सामना करावा लागला आणि प्लेगच्या तीन साथींनी शहराला ग्रासले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे सार्वजनिक कामे काही काळ थंडावली होती. मात्र, सरकारी रेकॉर्डनुसार अबकारी महसुलात आणि पर्यायाने लोकांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसताच, ही चळवळ पुन्हा जिवंत करण्याची गरज निर्माण झाली.
चळवळीची पुनर्रचना आणि ऐतिहासिक सभा (२४ सप्टेंबर १९०२)
लंडनहून मि. डब्ल्यू. एस. केन यांनी वारंवार विनंती केल्यानंतर, सोलापूरच्या नेत्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली. बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर १९०२ रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूरचे प्रतिष्ठित व्यापारी मि. रावजी नानचंद शेटजी यांच्या घरी एक ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेत सोलापूरच्या सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले.
सभेतील महत्त्वाचे ठराव:
१. स्वतंत्र अस्तित्वाची घोषणा: डॉ. रानडे यांनी प्रस्ताव मांडला की, 'सोलापूर पीपल्स असोसिएशन' ही एक राजकीय संस्था असल्याने, दारूबंदीच्या कामासाठी 'सोलापूर टेंपरन्स असोसिएशन' नावाने स्वतंत्र संस्था असावी. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.
२. प्रचारकाची नेमणूक: केवळ सभा न घेता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी, दरमहा १० रुपये पगारावर एका पूर्णवेळ प्रचारकाची नेमणूक करण्याचे ठरले.
३. बक्षीस योजना: लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी, १८ वर्षांवरील व्यक्तींकडून मद्यपानाचे १०० प्रतिज्ञापत्र (Pledges) भरून घेणाऱ्या कार्यकर्त्यास १ रुपया बक्षीस जाहीर करण्यात आले. यासाठी लागणारा १,००० सह्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी दानशूर व्यापारी मा.हिराचंद नेमचंद यांनी स्वीकारली.
सोलापूरचे शिलेदार (पदाधिकारी - १९०२)
या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे यात सोलापुरातील सर्वधर्मीय आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता:
अध्यक्ष: रेव्हरंड एल. एस. गेट्स (Rev. L. S. Gates)
उपाध्यक्ष: हिराचंद रामचंद्र गांधी, मा.रावसाहेब मल्लप्पा एच. वारद, (पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद) 
रावजी नानचंद शेटजी. चेअरमन: रावसाहेब हिराचंद नेमचंद दोशी.सचिव व खजिनदार: डॉ. पी. बी. केसकर.
व्यवस्थापन समिती: डॉ. एम. आर. रानडे, पी. एल. नागपूरकर, कृष्णाजी गोडबोले, शिवबसप्पा ए. शिलवंत, वकील मि. लेले आणि राव बहादूर पीर महंमद दफेदार. या सर्व नामवंत मंडळींचा सदर चळवळीत सक्रिय सहभाग होता.
संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि जनजागृती:
संघटनेने केवळ कागदी ठराव न करता प्रत्यक्ष कामाचा धडाका लावला. शहरात आणि जिल्ह्यात फिरून प्रचार करण्यासाठी मि. दामोदर गोविंद देवळालीकर यांची प्रचारक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या प्रयत्नांतून एका महिन्यातच १५० लोकांनी दारू सोडण्याची प्रतिज्ञा घेतली. हिराचंद गांधी (१५ रु.), रावजी शेटजी (१० रु.) आणि पी. एल. नागपूरकर (१० रु.) अशा देणग्यांमुळे चळवळीला आर्थिक बळ मिळाले.
सोलापूरमध्ये भरलेल्या 'प्रांतीय सामाजिक परिषदेत'
डॉ. टी. सी. खंडवाला यांनी दारूच्या दुष्परिणामांवर एक प्रभावी भाषण केले. त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडले की, "दारू हे अन्न नाही, ती शरीराचा आणि आत्म्याचा नाश करते." ब्रिटीश नेते मि. जॉन स्मेडली (John Smedley) यांनीही भारताच्या दौऱ्यात १३ डिसेंबर रोजी सोलापूरला भेट दिली, ज्यांचे स्वागत डॉ. केळकर यांनी केले.
सोलापूर प्रमाणे (Temperance Movement) भारतातील अनेक प्रांतांमध्ये आणि शहरांमध्ये हि चळवळ पसरली होती. मिस्टर जॉन स्मेडले यांच्या भारत दौऱ्याच्या संदर्भात आणि स्थानिक संस्थांच्या कामामुळे या चळवळीचा प्रसार लाहोर, अमृतसर, दिल्ली (उत्तर भारत), कलकत्ता, कटक, दाक्का (पूर्व भारत/बंगाल), बडोदा, सुरत, मुंबई, पुणे, सोलापूर, बिजापूर (पश्चिम भारत/दख्खन) आणि हैदराबाद, विझियानगरम, बेल्लारी, गुट्टी, मद्रास, बंगलोर (दक्षिण भारत) अशा प्रमुख शहरांमध्ये झाला होता.
काँग्रेसचा सहभाग आणि गांधीजींचे नेतृत्व
सुरुवातीच्या काळात इंडियन नॅशनल काँग्रेसने या विषयावर तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, 'अँग्लो-इंडियन टेंपरन्स असोसिएशन'च्या प्रभावामुळे काँग्रेसने याला राजकीय व्यासपीठावर आणले. त्यांनी दारूच्या समस्येला ब्रिटीश वसाहतवादाच्या शोषणाशी जोडले.
१९१४ नंतर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली या चळवळीला व्यापक स्वरूप आले. १९२० च्या असहकार चळवळीचा (Non-Cooperation Movement) एक भाग म्हणून देशभरात दारूच्या दुकानांसमोर निदर्शने (Picketing) सुरू झाली. गांधीजींनी याला नैतिक लढ्याचे स्वरूप दिले. सविनय कायदेभगांच्या वेळी ठिकठिकाणी दारुबंदीसाठी निदर्शने केली गेली 
सोलापूर मधे गांधीजींच्या आटकेचा निषेध म्हणून गिरणी कामगार रस्त्यावर उतरले यावेळी निषेधाचे प्रमुख मार्ग म्हणून दारु दुकानांची नासधूस करण्यात आली तसेच शिंदीची झाडे तोडून निषेध नोंदवला गेला.
( या जमावाला पांगवण्यासाठी ब्रिटिशांनी आमानुष गोळीबार केला यानंतर सोलापूर ने भोगलेले तीन दिवसांचे स्वातंत्र्य  ब्रिटिशांनी पुकारलेला मार्शल लॉ व सोलापूर च्या हुतात्म्यांचा ज्वाज्वल्य इतिहास हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले अत्यंत महत्वपूर्ण पान ) या सर्वांची बीजे सोलापूर मधे १९०२ साली सुरु झालेल्या दारुबंदी चळवळीच्या मुळाशी असणार हे नक्की.
या दारुबंदी चळवळीचा प्रमुख कणा होत्या सर्वसामान्य भारतीय स्त्रिया. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी स्त्रियांनी रस्त्यावर उतरून दारूच्या दुकानांसमोर शांततापूर्ण निदर्शने केली. कधीकधी संतापलेल्या जमावाने दुकानांची जाळपोळही केली.
सोलापूरच्या इतिहासातील, 'सोलापूर टेंपरन्स असोसिएशन'चा हा अध्याय आपल्याला सांगतो की, येथील समाजसुधारक, व्यापारी आणि सामान्य जनता अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देण्यासाठी जातीभेद धर्मभेद विसरून शहराच्या प्रश्नांसाठी कशी एकत्र येत होती व सोलापूरची समाजिक सुधारणा चळवळ किती जागृती व काळाच्या पुढे होती हेच यावरून दिसते.
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे .
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©
#solapurtales

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories