चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषात दुमदुमणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, म्हणजेच खंडोबाची महती अफाट आहे. मल्हारी मार्तंडाचा हा अवतार नेमका का आणि कसा झाला, याविषयी 'मल्हारी माहात्म्य' या प्राचीन ग्रंथात रंजक माहिती मिळते. सर्वसामान्य भक्तांना ही कथा काही अंशी ठाऊक असली, तरी मूळ ग्रंथातील संदर्भ अधिक रंजक आहेत. चंपाषष्ठीचे औचित्य साधून, खंडोबाच्या अवतार कथेवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.
कथासार
ही कथा घडली ती सत्ययुगात (कृतयुगात). मणिचूल नावाच्या पर्वतावर ऋषीमुनींची तपश्चर्या सुरू होती. सप्तर्षी आणि धर्मपुत्र शांततेत आपले यज्ञयाग करत होते. मात्र, या शांततेला नख लावण्यासाठी दोन क्रूर दैत्य त्या ठिकाणी अवतरले त्यांची नावे होती 'मणी' आणि 'मल्ल'. या दैत्यांनी पर्वतावर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि ऋषींचे पवित्र तपोवन उद्ध्वस्त करून टाकले.
गाईंचा वध केला ,ऋषींना विहरीत ढकलले व ऋषांचे आश्रम उध्वस्त केले सबंध पृथ्वीतलावर हाहाकार माजवला.
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥
या आकांताने भेदरलेले ऋषी देवांचा राजा इंद्र आणि पुढे भगवान विष्णूकडे मदतीसाठी धावले. परंतु स्वतः विष्णूही हतबल होते. याचे कारण म्हणजे मणी आणि मल्ल यांना खुद्द ब्रह्मदेवाचा वर लाभला होता, ज्यामुळे ते कोणालाही अजिंक्य ठरले होते . अखेरीस, संकटात सापडलेले ऋषी कैलासावर भगवान शंकरांकडे पोहोचले. ऋषींच्या तोंडून त्या उन्मत्त दैत्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकून भोळा सांब संतापाने थरथरला. त्याच क्षणी शंकरांनी रौद्र रूप धारण केले रागाने जटा आपटल्या त्यातून आक्राळ विक्राळ महामारी चा जन्म झाला. ती जन्माला येताच प्रचंड भुकेली होती. तिने शंकरांकडे अन्नाची मागणी केली. तेव्हा शंकरांनी तिला आज्ञा दिली
"तुझी क्षुधा मी परिहारी ।
दैत्य बळी देउनिया ॥
दैत्याचे सैन्य भक्षी सकळ ।
तृप्त करी आपला जठरानळ॥
"रक्षी सकळ अऋषीचे कुळ ।
आज्ञा तुजला हीच असे ॥"
म्हणजेच, "दैत्यांच्या सैन्याचे भक्षण करून आपली भूक भागव आणि ऋषीकुळाचे रक्षण कर," अशी आज्ञा देऊन भगवान शंकरांनी तिला युद्धासाठी सज्ज केले.ऋषांनी तिला तुप पाजून शांत केले त्यामुळे तिचे नाव घ्रुतमारी असे पडले. यानंतर स्वतः भगवान शिवानीं 'मार्तंड भैरवा'चा अवतार धारण केला. हे रूप धारण करताना शंकराच्या अंगाचा वर्ण तप्त कांचनाप्रमाणे (सोन्यासारखा) पिवळा धमक झाला होता. अंगावर हरिद्रा (हळद) आणि रक्तवर्ण (गुलाल/कुंकू) यांचे मिश्रण उधळलेले होते. या रूपाचे वर्णन ग्रंथात अतिशय सुंदर ओवीमध्ये केले आहे.
"तप्त कांचना ऐसे रूप पीत वर्ण ॥ वरि हारि द्वा चुर्ण उधळुन ।
तेणे अतिशय दिसे शोभाय मान्न ॥ पाहता नयनो झांकती॥"
तसेच, पीत (पिवळा) आणि रक्त (लाल) वर्ण एकत्र झाल्यामुळे या अवताराला 'मार्तंड' हे नाव प्राप्त झाले. सूर्यासारखी प्रखर तनु आणि शत्रूंचा काळ म्हणून 'भैरव', असे मिळून 'मार्तंड भैरव' हे नाव विख्यात झाले.
"पीत रक्त वर्ण एकत्र झाला ॥ म्हणोनी मार्तंड नाव पावला । सुर्या ऐसी तनुधरली ॥ भयंकर शब्द बैसे कंठाळी ॥"
या अवतारात शंकरांनी हाती खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र धारण केले होते. त्यांच्यासोबत नंदी, शृंगी आणि गणही सज्ज झाले. विशेष म्हणजे, शंकराचे हे रूप पाहून इंद्रादि देवांनी आनंदाने भंडारा (हळद) आणि गुलाल उधळला. त्यानंतर सर्व देव आपापली वाहने आणि शस्त्रे घेऊन मणिचुल पर्वताकडे धाव घेतली स्वतः मार्तंड भैरव नंदीवर स्वार झाले. नंदीचे वर्णन करताना कवी म्हणतात
"नंदी कैसा शोभला ॥ जैसा कैलास पर्वत धवला ।
हे युद्ध केवळ दोन योद्ध्यांमधील नव्हते, तर ते एक महायुद्ध होते. कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली तब्बल सात कोटी (ज्याला लोकभाषेत 'येळकोट' म्हटले जाते) गणांचे प्रचंड सैन्य घेऊन मार्तंड भैरव मणिचूल पर्वतावर उतरले.मल्लासुराला हि वार्ता समजल्यानंतर त्याने प्रथम शिवनिंदा केले परंतु त्याने शिवाचे सैन्य पहताच त्याची भितीने गाळण उडाली परंतु खोटा आवेश धारण करून त्याने युध्दाची सज्जता केली . दोन्ही सैन्य ऐकमेकांना भिडताच घनघोर युद्ध सुरू झाले .
पहिला दिवशी खडंगदंष्ट्र दैत्याचा वध कार्तिकेयाने केला.
युध्दाच्या दुसर्या दिवशी उल्कामुख (अग्निमुख) दैत्याचे मस्तक गणेशाने परशूने छाटले.
तिसरा दिवशी कुटिलोम हा मायावी दैत्य युध्दात उतरला या दैत्याचा वध भगवान शिवाच्या प्रिय शिष्य नंदीने शिंग-खुरांनी मारा करुन केला.
चौथ्या दिवसापर्यंत भैरव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढली .रागाने लालबुंद झालेले मणि मल्ल स्वतः युध्दासाठी तयार झाले .
घ्रुतमारी जी मार्तंड भैरवाच्या जटेतून प्रकटली होती ती सर्व प्रथम मल्लाला मारायला गेली, पण मणी मल्लाच्या मायावी शक्तीपुढे अपयशी ठरली. त्यामुळे पाचव्या दिवशी स्वतः मार्तंड भैरव रणांगणात उतरले
मार्रंड भैरवाचा परभाव करण्यासाठी आधी मणी पुढे सरसावला त्याच्याशी युद्ध करण्यासाठी स्वतः मार्तंड भैरव युध्दास सज्ज झाले या दोघांनी ऐकमेकांनवर शस्त्र अस्त्रांनी प्रहार सुरू केले त्या प्रहारांनी धरणीला कंप सुटला शस्त्रांच्या आवाजांनी आसमंत दणाणून निघाले
मार्तंडा समोर शस्त्र अस्त्र चालेना हे कळल्यावर मणीने मायावी रुप धारण केले कधी जमीनीवर तर कधी आकाशातून मणी युद्ध लढू लागला परंतु शेवटी मार्तंड भैरवांच्या त्रिशुळाच्या प्रहारांनी मणी दैत्याची छाती विदीर्ण झाली आणि तो जमिनीवर कोसळला. मार्तंड भैरवांनी त्याच्या मस्तकावर पाय देण्यासाठी पाय उचलताच पश्चातापाने मणीने भैरव चरणांचा स्पर्श करुन भैरवाची स्तुती करण्यास प्रारंभ केला या स्तुतीने भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी मणीस वर दिला मणीने म्हणला "हे शंभु महादेवा माझे डोके सदैव तुझ्या चरणाखाली असु दे व मला तुझ्या सोबत कायमचे स्थान दे" मार्तंड भैरवांनी ते मान्य केले व मणीला मोक्षप्राप्ती झाली.
मणिदैत्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या मार्तंड भैरवांनी मणीच्या भावास मल्लास जीवनदान देण्याचे ठरवले व त्याला युध्दापासुन थांबवण्यासाठी शिष्टाई करण्यासाठी साक्षात भगवान विष्णुंना पाठवले परंतु मल्लासुर भावाच्या मृत्युने अतिशय संतप्त झाला होता भगवान विष्णुंच्या मध्यस्थीचा काही उपयोग झाला नाही दैत्य सेना व भावाच्या मृत्यू ने क्रोधीत झालेला मल्लासुर मार्तंड भैरवांनवर चालुन गेला दोघांचे बराचवेळ भिषण युद्ध चालले शेवटी खडग प्रहाराने मल्लासूर घायाळ झाला व भगवान शिवाची स्तुती करू लागला शिव प्रसन्न झाले व मल्लासुरास वर दिला अंतसमयी मल्लासूर देवाला शरण आला आणि म्हणाला, "हे देवा, माझे नाव तुझ्या नावाच्या आधी जोडले जावे." म्हणजेच 'मल्ल' आणि 'अरी' (शत्रू) मिळून लोकांनी तुम्हाला 'मल्हारी' म्हणून ओळखावे. देवाने त्याचीही इच्छा पूर्ण केली. यानंतर देवांनी भक्तांना अश्वरुपात आरुढ होऊन दर्शन दिले . स्वर्गातून देवतांनी पुषवृष्टी व भंडार्यांची उधळण केली यळकोट यळकोट जय मल्हार च्या गर्जंनांनी आसमंत फुलुन गेले .
अशा प्रकारे, दुष्टांचे निर्दालन करून ऋषींना भयमुक्त केल्यानंतर, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मार्तंड भैरव
मार्गशीर्ष शुध्द षष्ठी शततारका नक्षत्र या शुभ क्षणी आपली पत्नी म्हाळसा देवींनसोबत लिंगव्दयाच्या रूपाने पृथ्वीवर अवतार धारण केला तो साहवा दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय .
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
प्रेमपूर' (ज्याला पेेंबर म्हटले जाते) येथे मार्तंड भैरव म्हाळसेसह प्रकट झाल्यानंतर तेथे यात्रेसाठी देव गोळा झाले आणि त्यांनी उत्सवासाठी मार्तंड भैरवाची मातीची 'मृण्मय मूर्ती' स्थापन केली तिचे नाव मैलार म्हणजे प्रथम स्वयंभू लिंग व नंतर मुर्ती तयार झाली.
सर्वासां वर्णजातीनां ध्यानगम्या सुरैः कृता ।
मूर्तिर्महीमयी शम्भोर्यथा मार्तंडभैरवी ॥
मैलार' या नावाचे स्पष्टीकरण 'मल्लारिमाहात्म्या'त खालील प्रमाणे दिले आहे-
मः शम्भु रश्च विष्णुश्च ताविलायां यदा स्थितौ ।
तदा मेलापदं जातं तामरातीति विग्रहात् ।।
मैलार इति मल्लारेर्नामधेयमभूत्तदा ।
सावर्ण्यं रलयोः प्रोक्तं मैराल इति तेन वा ।।'
'म' म्हणजे शंभु व 'र' म्हणजे विष्णू. ते जेव्हा 'इला' म्हणजे पृथ्वी (माती) मध्ये स्थित केले, तेव्हा त्या मृण्मय मूर्तीला 'मैलार' हे नाव प्राप्त झाले. म + इला + र- मैलार. 'र' आणि 'ल' यांचा सावर्ण्यामुळे विपर्यय होऊन पुढे 'मैलारा'चेच 'मैराल' असे रूपांतर झाले.
असा हा मल्हारी मार्तंडाचा अवतार थोड्याच कालावधीत इतका प्रचंड लोकप्रिय झाला त्याने अभिजनांनपासून बहुजणांनपर्यंत सर्व जाती जमातीतील कितीतरी लोकांच्या देव्हार्यात कुलदैवताच्या रुपात स्थानापन्न झाला व तो आजतागायत भक्तांचे रक्षण करतो आहे.
|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
संदर्भ - मल्हारी महात्म्य
महाराष्ट्रातील चार दैवते ( ग.ह.खरे)
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा ( रा.चि.ढेरे)
दक्षिण भारतातील खंडोबा एक जागृत दैवत (मेघा गायकवाड)
कुलदैवत खंडोबा ( डॉ . विठ्ठल बापुजी ठोंबरे)
Post by _ अतुल देशपांडे
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी.
Comments
Post a Comment