श्री खंडोबा देवाचा परिवार
मागील लेखात मल्हारी मार्तंड अवताराची कथा देण्यात आली होती, जिचा आधार 'मल्हारी माहात्म्य' हा प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. परंतु या मूळ ग्रंथात खंडोबाच्या विवाहासंबंधी भाष्य नाही, तसेच बाणाई व हेगडे प्रधान यांच्या कथा किंवा वाघ्या-मुरळीची चर्चा नाही (संदर्भ: रा.चि. ढेरे - दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा)
खंडोबाची उपासना आणि त्याच्या परिवारासंबंधित लोककथा व त्यांचे संकलन 'मार्तंड विजय' आणि 'जयाद्री माहात्म्य' यांसारख्या ग्रंथांत नंतर येत गेले.
'मल्हारी माहात्म्य' या ग्रंथाचा कर्ता व काळ निश्चित नाही, तो साधारण १२६०-१२७० च्या दरम्यानचा असावा (रा.चि. ढेरे). हा ग्रंथ सिद्धपाल केसरींनी मराठीत आणला. तसेच 'मार्तंड विजय' हा ग्रंथ महाकवी गंगाधर कमलाकर यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ शके १७४५ (सन १८४३) मध्ये लिहिला गेला, असे मानले जाते.
हा ग्रंथ ओवीबद्ध असून त्यात सुमारे ४,५५६ ओव्या आहेत.
सदर लेखात श्री खंडेरायांच्या परिवारातील इतर देवता व घटकांचा आढावा घेण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने खंडेरायाच्या दोन पत्नी, प्रधान तसेच खंडोबाचे वाहन घोडा व श्वानाचा समावेश होतो.
१. म्हाळसादेवी (आदिशक्ती व अर्धांगिनी)
खंडोबाच्या उपासनेत म्हाळसा देवींचे स्थान सर्वोच्च आहे. त्या केवळ पत्नी नसून साक्षात 'आदिशक्ती' आणि पार्वतीचे रूप आहेत. 'मल्हारी माहात्म्य' मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, शिवाच्या अर्धांगी राहण्यासाठी पार्वतीने म्हाळसेचे रूप घेतले.
मूळ स्वरूप (मल्हारी माहात्म्य)
या ग्रंथात म्हाळसेचे वर्णन करताना सिद्धपाळ केसरी लिहितात की, शैलाजा (पार्वती) म्हाळसा रूपात प्रगट झाली
"अर्धांगी शैलजा बाळी । म्हाळसारूपें महाकाळी ।
ते प्रगटली हृदयकमळीं । विश्वमाता ।।"
गंगाधर कवींनी म्हाळसेच्या रूपाचे अतिशय तेजस्वी वर्णन केले आहे. ती शिवाच्या अर्धांगी कशी शोभून दिसते, याचे वर्णन ते करतात,
"इंद्रनीळ टाकूनो सोज्वळ ॥ तैसी तनु अती निर्मळ ॥
शाम तनु सुकोमळ ॥ शिवाचे अर्धांगी विराजे ॥"
(अर्थ: इंद्रनीळ मण्याप्रमाणे तिची कांती सोज्वळ आणि निर्मळ आहे. अशी ही शामवर्णी, सुकुमार म्हाळसा शिवाच्या अर्धांगी विराजित आहे.)
खंडोबा देवाचे एक नाव 'म्हाळसाकांत' हेही आहे.
लोकश्रद्धेनुसार म्हाळसा हा मोहिनीचा अवतार समजला जातो. त्याची कथा अशी की,
अमृतमंथनाच्या वेळी श्री विष्णूंनी धारण केलेल्या मोहिनी अवताराचे सौंदर्य पाहून शिव तिच्यावर भाळले व तिच्या मागे धावू लागले. ही कथा श्रीमद्भागवताच्या अष्टम स्कंधात येते. शिवाची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिनीने शिवास आश्वासन दिले की,
"तुम्ही जेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार घ्याल, तेव्हा मी म्हाळसेच्या रूपाने तुमची विवाहाची इच्छा पूर्ण करेन." लोकश्रद्धेनुसार म्हाळसा ही साक्षात मोहिनी नसून, मोहिनीच्या ध्यासाने शिवाला पार्वती मोहिनी रूपात भासू लागली, तिचा हा अवतार म्हणजे म्हाळसा होय.
श्री म्हाळसा देवींचे पिता नेवासे गावचे तिम्मणशेट वाणी आहेत, असा उल्लेख लोककथांमधून येतो. म्हाळसा देवी बालिकेच्या रूपात तिम्मणशेटच्या घरी अवतरल्या,
त्यांनी तिचा सांभाळ केला. पुढे मल्हारी देवांनी तिम्मणशेटांना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानुसार पुढे पौष शुद्ध १५ या दिवशी मार्तंड भैरव व म्हाळसा देवींचा विवाह पाली येथे झाला.
म्हाळसा खंडोबाची पत्नी असली तरी म्हाळसा देवींची अनेक स्वतंत्र मंदिरे आहेत. देवरगुड्ड येथील बनशंकरी हे मूळचे म्हाळसेचे मंदिर आहे.
बीदर जवळ स्वतंत्र म्हाळसापूर आहे. नेवासे येथेही प्राचीन मंदिर आहे, तिथे म्हाळसेचे मोहिनीशी एकात्म पावले आहे (संदर्भ: रा.चि. ढेरे). बीडमध्ये खंडेश्वरी मंदिर आहे.
२. बानाई / गंगा
लोकसाहित्यात ज्यांना 'बानाई' म्हणून ओळखले जाते, त्यांचा उल्लेख या पोथ्यांमध्ये 'गंगा' स्वरूपात मानला आहे.
बाणाई ही मूळची स्वर्गातील इंद्राची मुलगी होती, परंतु तिने आपल्या पित्यासमोर स्वतःच्या आत्मकर्तृत्वाचा अभिमान मिरवल्यामुळे इंद्राने रागावून तिला शिक्षा दिली. त्याने तिला लहान बाळ बनवून पेटीत बंद केले आणि पृथ्वीवर चंदनपुरीच्या जंगलात सोडून दिले. ती पेटी तेथील धनगरांना सापडली, त्यांनी त्या मुलीचे नाव 'बानू' ठेवून तिचे पालनपोषण केले. पुढे वयात आल्यावर बानूने शंकराची उपासना केली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या खडावा (पादुका) घालून ती जेजुरीला आली. तिथे खंडोबाला पाहताच ती त्यांच्या प्रेमात पडली आणि तिने प्रेमपत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
तिचे पत्र वाचून खंडोबा अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुद्दाम सारीपाटाचा डाव हरून १२ वर्षांचा वनवास स्वीकारला. त्यानंतर देवांचा गुरू भुलेश्वर याच्या सांगण्यावरून खंडोबाने म्हाताऱ्या धनगराचे रूप घेतले आणि ते बाणाईच्या घरी मेंढ्या राखण्याच्या चाकरीला राहिले.
एके दिवशी खंडोबाने रानात नेलेल्या सातशे मेंढ्या मारल्या आणि हे पाहून रडणाऱ्या बाणाईसमोर अट ठेवली की, "तू माझ्याशी लग्न करण्यास तयार असशील, तरच मी या मेंढ्या जिवंत करेन." नाईलाजाने बाणाईने होकार देताच खंडोबाने मेंढ्या जिवंत केल्या आणि आपले मूळ रूप धारण करून तिच्याशी विवाह केला व बाणाईस आपल्या गत जन्माची आठवण करून दिली. लग्नानंतर जेव्हा दोघे जेजुरीला आले, तेव्हा खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा बाणाईला पाहून खूप संतापली. तेव्हा तिची समजूत घालण्यासाठी अखेर खंडोबाने जेजुरी गडाचा वरचा भाग म्हाळसेला आणि खालचा भाग बाणाईला वाटून दिला. तेव्हापासून बाणाई गडाच्या पायथ्याशी राहू लागली.
लोकसाहित्यात म्हाळसा आणि बाणूच्या भांडणाची, तसेच देवाने मध्यस्थी करून जेजुरी गडाची केलेली वाटणी यावर असंख्य लोकगीते आहेत.
भांडण मिटल्यानंतर त्या एकरूप झाल्याचे वर्णनही आढळते.
काखेला कोकरू, बाणु जातिया नटतु,
देवा मल्लारिनं झेंडा लाविला पेटतु!
देव मल्लारि म्हणतु, कां ग म्हाळसा, रागं रागं?
गेलों व्हतों शिकारीला, बाणु लागुनि आली मागं!
देव मल्लारि म्हणतु, कां ग म्हाळसा, रागामंदी?
गेलों व्हतों शिकारीला, बाणु धावली बागेमंदी!
काखेला कोकरू, बाणु जाती मेंढवाड्या,
मल्लारिदेव तिच्या राखितो शेळ्यामेंढ्या!
गंगा व गौरीचे एकरूप होणे (मल्हारी माहात्म्य):
जेव्हा गंगा आणि पार्वती (गौरी) यांच्यात वाद झाला, तेव्हा मार्तंड भैरवाने दोघींना एकत्र केले.
"गंगागौरीसी एक होउनी । सुंदर रूप म्हाळसे चें धरूनी ।
ते मार्तंडभैरवें अर्धांगी घेउनी । प्रीती करुनी बैसविली ।।"
श्री. गुप्ते त्यांच्या 'हिंदू हॉलिडेज अँड सेरिमोनिअल्स' या ग्रंथात खंडोबाला सूर्याचे प्रतीक ठरवताना चंपाषष्ठी दिवशीच्या खगोलीय स्थितीचे जे वर्णन आहे, त्यावरून बाणाईस शततारका नक्षत्राचे प्रतीक मानतात. पांडुरंग देसाईंच्या मते बाणाईचा संबंध 'बाणाशी' जोडतात; मल्हारी देवांना खडगासोबत लढाईत बाणांची आवश्यकता असणार, त्या बाणांना भक्तांनी 'बाणाई' बनवले असे ते मानतात. तर ग.ह. खरे बाणाईच्या मूर्तीत डोक्यावर असणारी हंड्याची उतरंड व कोकरू हे धनगर गवळणीच्या रूपात बघतात.
३. हेगडे प्रधान (विष्णूचे रूप)
खंडोबाच्या कथेत 'प्रधान' म्हणून जे कार्य करतात, ते साक्षात भगवान विष्णू आहेत. असुरांचा नाश करण्यासाठी शिवाला मदत म्हणून विष्णूंनी हे रूप घेतले होते. जेव्हा ऋषींनी विष्णूकडे मदतीची मागणी केली, तेव्हा विष्णूंनी सांगितले की या दैत्याचा वध केवळ शिवच करू शकतात, पण मी तिथे नक्कीच साहाय्यक म्हणून असेन.
"तो ब्राह्मणाचा पक्षपाती । दैत्य वध करावयाची युक्ती ।
मनी कल्पुनी लक्ष्मी पती । कैलासा प्रती जातसे ।।"
विष्णू गरुडावर बसून मल्लासुराकडे शिष्टाई करण्यासाठी गेले होते, जिथे त्यांनी निशस्त्र होऊन दूताचे कार्य केले:
"ऐसें शंभू वचन ऐकोनी । विष्णू गरुडावरी निःशस्त्र बैसोनी ।
एकलाची शांतमूर्ति धरुनी । मल्लाप्रती जाता झाला ।।"
४. घोडा (दैत्य मणी)
मल्हारी देव व मणी यांच्या युद्धाच्या वेळी मणी घोड्यावर स्वार होऊन युद्धास निघाला, त्या वेळेस शंकराने चंद्रास घोडा होण्याची आज्ञा केली. ते चंद्ररुपी अश्वावर स्वार होऊन युद्धास गेले, त्यामुळे खंडोबाचा अश्व चंद्राचे रूप मानले जाते. मणी वधाच्या वेळी मणीने "आपले वाहन अश्व खंडोबाने धारण करावे" अशी विनंती केली, म्हणून खंडोबाने अश्व हे वाहन धारण केल्याचे मानले जाते.
जेव्हा खंडोबाने मणी दैत्याचा पराभव केला, तेव्हा मणी दैत्याने मरताना देवाकडे वर मागितला की, मला माझ्या घोड्यासहित तुमच्या जवळ स्थान मिळावे.
मूळ ओवी (मल्हारी माहात्म्य, अध्याय १७, ओवी ६०-६१):
"माझें रूप जें तुरंगासहित । तें असावें तुज सन्निहित ।
ऐसें वचन ऐकोनी समस्त । देव बोलता झाला दैत्यासी ।। ५. कुत्रा (श्वान)
खंडोबा हे शिवाचे 'भैरव' रूप आहे. भैरवनाथ आणि श्वान (कुत्रा) यांचे नाते अतूट आहे.
भैरवाची खूण म्हणून कुत्र्याचे अस्तित्व मल्हारी मार्तंडांच्या सोबत आहे. या दोन्ही ग्रंथांत युद्धाच्या वेळी आणि देवाच्या सभोवताली कुत्र्यांचे अस्तित्व ठळकपणे नमूद केले आहे.
जेव्हा मार्तंड भैरव युद्धासाठी निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत श्वानही गर्जना करत होते
"सवें श्वान थोर गर्जत । सप्तकोटी गण परिवारित ।
पिशाचसमुदाय विराजित । शोभतसे अतिशोभं ।।"
(अर्थ: देवाच्या सोबत कुत्रे (श्वान) गर्जना करत होते आणि सात कोटी गणांचा परिवार सोबत होता.)
देवाच्या सभोवताली श्वान (मार्तंड विजय)
जेव्हा देव युद्धासाठी सज्ज झाले, तेव्हा त्यांच्या सभोवताली श्वानांची गर्दी झाली होती .
"सभोवती श्वानाची दाटी ॥ सन्निद्ध शिव गणाची थाटी ॥
ऋषि आग्रभागी तिष्टती ॥ स्तविताहेत ईश्वराते ॥"
असा हा मल्हारी आपल्या परिवारासोबत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष आहे व खंडोबाचे लाखो भक्त या परिवाराचाच एक भाग आहेत अशा या मल्हारी देवास नमस्कार असो .
सर्वासां वर्णजातीनां ध्यानगम्या सुरैः कृता ।
मूर्तिर्महीमयी शंभोर्यथा मार्तंडभैरवी ।।
यळकोट यळकोट जय मल्हार!
संदर्भ - मल्हारी महात्म्य
मार्तंड विजय
महाराष्ट्रातील चार दैवते ( ग.ह.खरे)
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा ( रा.चि.ढेरे)
दक्षिण भारतातील खंडोबा एक जागृत दैवत (मेघा गायकवाड)
कुलदैवत खंडोबा ( डॉ . विठ्ठल बापुजी ठोंबरे)
Post by _ अतुल देशपांडे.
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी.
Comments
Post a Comment