लंडनची रंगभूमी गाजवणारा सोलापूरकर ( 1897)

विस्मरणात गेलेला अभिनेता 'एडवर्ड ओ'नील'
( लंडन ची रंगभूमी गाजवणारा एक सोलापूरकर )
सोलापूरच्या इतिहासाची पानं चाळली तर अनेक दिग्गज व्यक्तींची नावं समोर येतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? १८९७ साली लंडनच्या रंगमंचावर गाजलेला एक नट चक्क आपल्या सोलापूरचा होता! ही गोष्ट आजवर कोणाला फारशी ठाऊक नव्हती. ३ मार्च १८९७ रोजी लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'द स्केच' या मासिकातील एका बातमीमुळे आणि जुन्या ऐतिहासिक नोंदीमुळे हा रंजक प्रवास उलगडला आहे.
सोलापूरशी असलेलं नातं
जगाने ज्यांना 'एडवर्ड ओ'नील' म्हणून ओळखलं,
 त्या अभिनेत्याचं खरं नाव होतं 'एडवर्ड आल्फ्रेड मोर्स बेचर'. बॉम्बे स्टाफ कॉर्प्सचे कर्नल हेन्री मोर्स यांच्या स्मरणार्थ हे नाव ठेवलं होत.
त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १८६२ रोजी आपल्या सोलापुरात झाला. त्याकाळी सोलापूर हे ब्रिटिशांचं एक महत्त्वाचं लष्करी ठाणं (कॅन्टोन्मेंट) होतं. 
एडवर्ड यांचे वडील, मेजर जनरल आल्फ्रेड बेचर हे ब्रिटीश लष्करात अधिकारी होते. १८६० च्या दशकात त्यांची पोस्टिंग सोलापूरच्या लष्करी तळावर झाली होती. त्यांच्या आईचं नाव होतं कॅरोलिन मारिया मोर्स.
 'बेचर' हे त्याकाळी भारतात कार्यरत असलेलं एक मोठं लष्करी घराणं मानलं जायचं. त्यामुळे साहजिकच एडवर्ड यांचं बालपण सोलापूरच्या मातीत आणि लष्करी शिस्तीच्या वातावरणात गेलं. पुढे शिक्षणासाठी आणि करिअरसाठी हे कुटुंब इंग्लंडला परतलं.
घरात लष्करी वारसा असल्यामुळे वडिलांची इच्छा होती की, मुलानेही आपल्याप्रमाणेच सैन्यात भरती होऊन 'रेड कोट्स' (ब्रिटीश सैनिकांचा गणवेश) चढवावेत. पण एडवर्ड यांचं मन सैन्यात नाही, तर अभिनयात रमलं होतं. त्यांनी लष्कराची वाट सोडून अभिनयाची वाट धरली.
१८९७ मध्ये लंडनच्या 'कोर्ट थेटर'मध्ये 'मारियाना' नावाचं एक गाजलेलं नाटक आलं होतं. या नाटकात एडवर्ड ओ'नील यांनी 'डॉन पाब्लो' ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही भूमिका एका कडक शिस्तीच्या, संशयी आणि श्रीमंत स्पॅनिश पतीची होती. विशेष गोष्ट म्हणजे, ज्यावेळी एडवर्ड लंडनमध्ये हे नाटक करत होते, तेव्हा तिथे छापून आलेल्या एका बातमीत लेखकाने एक खास उल्लेख केला होता. त्यात म्हटलं होतं, "हा अभिनेता सोलापूरचा असून सध्या त्याच्या जन्मगावी भयंकर दुष्काळ पडला आहे." १८९७ सालच्या सोलापूरच्या दुष्काळाची चर्चा थेट लंडनपर्यंत पोहोचली होती, हे यावरून समजतं.
पुढे १८९९ मध्ये स्वतःच्या नाटकांच्या निर्मितीत मोठं नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण ते खचले नाहीत.
मूकपटांच्या जमान्यातील स्टार
केवळ नाटकापुरते मर्यादित न राहता, एडवर्ड यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या मूकपटांच्या (Silent Films) लाटेतही स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका खालीलप्रमाणे होत्या:
'हेन्री ८' (१९११) या सिनेमात त्यांनी 'ड्युक ऑफ सफोक' ही भूमिका केली.
'द मॅन्क्समॅन' (१९१६) हा त्या काळातील एक प्रसिद्ध चित्रपट होता.
'मेरी गर्ल' (१९१७) यात त्यांनी 'जॉर्ज लॅटिमर'ची भूमिका साकारली.
'डॉन क्विक्झोट' (१९२३) या जगप्रसिद्ध कथेवर आधारित सिनेमात त्यांनी 'ड्युक ऑफ अल्वारेझ'ची व्यक्तिरेखा वठवली.
अगदी वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत, म्हणजेच १९२९ मधील 'लिली ऑफ किलार्नी' या चित्रपटापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते.
वैयक्तिक आयुष्य
१८९१ मध्ये त्यांनी अभिनेत्री रोझ मेलर यांच्याशी विवाह केला. रोझ या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर त्या एक लेखिका होत्या आणि लंडनमधील प्रसिद्ध अशा 'रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमेटिक आर्ट'मध्ये शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांनी आवाजाच्या आणि अभिनयाच्या तंत्रावर पुस्तकंही लिहिली होती. १९०१ च्या जनगणनेनुसार या दांपत्याला एक मुलगी होती, जी त्यांच्यासोबत लंडनमध्ये राहत होती. दुर्दैवाने, १९१७ मध्ये एडवर्ड आणि रोझ यांचा घटस्फोट झाला.
सोलापुरात जन्मलेल्या या मुलाचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. एका लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा ते लंडनच्या रुपेरी पडद्यावरचा 'ड्युक' असा हा एडवर्ड ओ'नील यांचा प्रवास! २० ऑगस्ट १९३८ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी इंग्लंडमधील ट्विकनहॅम येथे त्यांचं निधन झालं.
यानिमित्ताने सोलापूरच्या इतिहासातील हे एक विस्मरणात गेलेलं; पण अतिशय महत्त्वाचं पान आज पुन्हा प्रकाशात आलं आहे.
संकलन / भाषांतर
अतुल देशपांडे.
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी
#solapurtales

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories