सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णक्षण: पंडित जवाहरलाल नेहरूंचे दोन ऐतिहासिक दौरे (१९३१ आणि १९३७)

 

पंडित नेहरूजींचे दोन दौरे: सोलापूरच्या जनसागराचा स्वातंत्र्यलढ्यातील हुंकार.

सोलापूर शहराचा इतिहास हा त्यागाचा आणि शौर्याचा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या शहराने दिलेले योगदान अतुलनीय आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, राष्ट्रनेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला दिलेले दोन भेटी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. या दौऱ्यांनी सोलापूरकरांमध्ये नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध लढण्याचे बळ दिले.

आज आपण 'सोलापूर समाचार' आणि 'द इंडियन एक्सप्रेस' मधील तत्कालीन वृत्तांतांच्या आधारे या दोन दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत.

१. डिसेंबर १९३१ मध्ये सोलापूर एका कठीण प्रसंगातून जात होते. मार्शल लॉच्या छायेतून बाहेर पडत असलेल्या या शहराला धीर देण्यासाठी पंडितजी आले होते.

टिळक चौकातील ऐतिहासिक सभा: नेहरूजी 20 डिसेंबर रोजी सोलापूर ला भेट देणार असल्याने त्यांना मानपत्र देण्यासाठी व सभेच्या नियोजनबद्ध आधी १९ डिसेंबर १९३१ रोजी टिळक चौकात एक विराट सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षपद डॉ. वैशंपायन यांनी भूषविले होते. श्री. राजवाडे यांनी मांडलेला मानपत्राचा ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला.

पार्क मैदानावरील प्रचंड स्वागत समारंभ.

पंडित जवाहरलालजींचे भाषण !

नागरिकांकडून मानपत्र.

नेहरूजींची मिरवणूक संपल्यानंतर पं. जवाहरलालजी नेहरू, सौ. कमलदेवी चटोपाध्याय, डॉ० हर्डीकर वगैरे मंडळी शेठ गुलाबचंद यांचे वाड्यांत गेली आणि मिरवणुकीचे लोकही पार्क मैदानांवरील मानपत्र समारंभ सभेसाठीं निघून गेले. पार्क मैदान अगदी गजबजून गेलें होतें. मध्यभागीं एक उंच व्यासपीठ तयार केले असून कोच, खुर्च्या व टेबल यांची व्यवस्थित मांडणी करण्यांत आली होती. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या उजेडाने जिकडे तिकडे झगझगाट झाला होता. स्त्रियांसाठी बसण्याची खास व्यवस्था केली असून पुरुषाकरितांही व्यवस्थित जागा केलेली होती. सुमारें वीस बावीस हजार लोक सभेला जमले होते, त्यांत ७/८ शें स्त्रियाही होत्या.

साडे नऊ वाजता पं. जवाहरलालजी मैदानावर आल्यावर त्यांचे नावाने जयघोष झाला व टाळ्यांचा कडकडाट सुरू असतांना पंडितजी तसेच सौ० कमलदेवी चटोपाध्याय व्यासपीठावर येऊन बसल्या. त्यानंतर कर्नाटक प्रां. परिषदेचे श्री. सदाशिवराव, दिवाकर हिंद सेविका दलातील  प्रमुख स्त्रिया शेठ माणिकचंद जाम मिलेचे श्री. व्यास श्री. शिवशालप्पा देशमुख, डॉ. आंत्रोळीकर शेठ गुलाबचंद इत्यादि मंडळीहि व्यासपीठावर येऊन बसली.नंतर पावणेदहा वाजता श्री. विभुते यांनीं 'झेंडा ऊंचा रहे हमारा' हे ध्वजगीत म्हणून कार्यक्रमास सुरवात केली. मग येथील कॉ. चे अध्यक्ष डॉ. आंत्रोळीकर यांनीं सोलापूर नागरिकांतर्फे पंडीतजींना मानपत्र अर्पण केलें.नंतर टाळ्यांच्या गजरांत पुष्पहार घातल्यावर पं. जवाहरलालजी भाषण करण्यास उठले त्यांच्या हिंदी भाषणाचा आशय पुढीलप्रमाणे होता:- बंधू भगिनींनो, आपल्या वतीने मला पुष्पहार व मानपत्र दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो परंतु मी येथें मानपत्र घेण्यासाठीं किंवा फुलांचे हार वाहून घेण्यासाठीं येथें आलो नाहीं!

या पूर्वीच येथें येण्याची माझी फार इच्छा होती पण अनेक कारणांमुळे ते शक्य झाले नाहीं तथापि येथें घडलेल्या गोष्टींची मला पूर्ण आठवण आहे. मी नैनीच्या तुरुंगात असतांना दीड वर्षाखालीं ज्या महिन्यांत सोलापूर विषयी मला थोडी फार खबर मिळाली तुरुंगांत बाहेरच्या जगातील वातावरणाची बहुतेक माहिती समजून येत नसली तरी  सोलापूर विषयी जे कांही थोडे समजले ते ऐकून मन उद्विग्न व संतापाने भरून आले  त्याच वेळीं निर्धार केला कीं, वेळ येताक्षणी समोरा समोर एकमेकांशी सामना करुं! गेल्या जानेवारी महिन्यात येथील चार जणांना बेगुन्हा फासावर लटकवण्यांत आले! बेगुन्हा असलेल्या चार जीवांना फाशी दिली ही गोष्ट शिलाखेला प्रमाणे ह्रदयात कोरली आहे. ती विसरणे केव्हाही शक्य नाही, या जुलमी सत्तेने जुलूम मी जाणून आहे, आणि जोपर्यंत जीव आहे तो पर्यंत या जुलमी सत्तेचे विरुद्ध मी लढेन  मानपत्राला उत्तर देताना पंडितजींनी एक अजरामर वाक्य उच्चारले— "केवळ अधिकाऱ्यांवर हल्ले करून राज्य कोसळणार नाही; पान तोडण्यापेक्षा मूळ वृक्षच (ब्रिटिश सत्ता) तोडला पाहिजे". त्यांनी सोलापूरकरांचे कौतुक करताना म्हटले की, मार्शल लॉच्या दडपशाहीनेही सोलापूरचे लोक दबले गेले नाहीत.

कुर्डुवाडीतील अभूतपूर्व स्वागत: २१ डिसेंबर १९३१ रोजी पहाटे ३ वाजता पंडितजी रेल्वेने मुंबईकडे रवाना होत असताना, माढा काँग्रेस कमिटीच्या आग्रहास्तव ते कुर्डुवाडी स्टेशनवर उतरले. मध्यरात्रीची वेळ असूनही ६०० ते ७०० कार्यकर्त्यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले.

२. १९३७ चा दौरा: स्वराज्याची तीर्थयात्रा आणि ३०,००० चा जनसागर

फेब्रुवारी १९३७ मध्ये पंडित नेहरू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते केवळ नेते म्हणून नव्हे, तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जनतेसमोर आले. 

पंढरपूरची भेट: १५ फेब्रुवारी १९३७ रोजी पंडितजींनी पंढरपूर येथे मोठ्या सभेला संबोधित केले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, ते आपल्या लोकांसाठी 'स्वराज्य' शोधण्याच्या तीर्थयात्रेवर आले आहेत. त्यांच्या मते, गुलामगिरीत असलेल्या लोकांसाठी स्वराज्य मिळवणे हाच एकमेव खरा धर्म आहे.

सोलापूरमधील ३०,००० लोकांची उपस्थिती: रात्री उशिरा सोलापूरमध्ये त्यांचे आगमन झाले. सोलापूर समाचारच्या जुन्या स्मृती जागवत त्यांनी ३०,००० लोकांच्या जनसमुदायाला संबोधित केले. रात्रीची वेळ असूनही लोकांनी त्यांचे प्रेरणादायी भाषण तब्बल एक तास शांतपणे ऐकले.

मार्शल लॉच्या आठवणी आणि सामाजिक प्रश्न: पंडितजींनी १९३१ च्या मार्शल लॉच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. तसेच, सभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी 'शारदा कायद्या'चे (बालविवाह प्रतिबंधक कायदा) समर्थन केले आणि अधिक कडक सामाजिक कायद्यांची गरज व्यक्त केली.

संदर्भ- 

सोलापूर समाचार (१९३१) आणि द इंडियन एक्सप्रेस (१९३७) 

आभार - हि.ने.वाचनालय 

संकलन/भाषांतर

अतुल देशपांडे

सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories