डॉ. ॲनी बेझंट यांचा सोलापूर दौरा (१९९६)

Annie Besant

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १९१६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच काळात लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांनी 'होमरूल लीग'च्या माध्यमातून स्वराज्याची मागणी लावून धरली होती. या चळवळीचा प्रसार करण्यासाठी डॉ. ॲनी बेझंट यांनी देशभर दौरे केले. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ९ मार्च १९१६ रोजी त्यांनी सोलापूर शहराला भेट दिली होती. तत्कालीन दस्तऐवजांच्या आधारे या भेटीचा घेतलेला हा आढावा.

सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन

९ मार्च १९१६ रोजी डॉ. बेझंट यांचे सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरातील तत्कालीन प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिलचे (जुनी गिरणी) मालक शेठ नरोत्तम मोरारजी गोकुळदास, प्रसिद्ध व्यापारी शेठ हिराचंद नेमचंद, सोलापूर नगरपालिकेचे तत्कालीन चीफ ऑफिसर आर. बी. पित्रे आणि शहराचे मॅजिस्ट्रेट यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्या सोलापूर मुक्कामाची व्यवस्था शेठ नरोत्तम मोरारजी यांच्या  निवासस्थानी करण्यात आली होती.

'रिपन हॉल' आणि नामदार गोखलेंच्या प्रतिमेचे अनावरण

या भेटीतील मुख्य कार्यक्रम सोलापुरातील 'रिपन हॉल' (Rippon Hall) येथे पार पडला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे १९१५ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, डॉ. बेझंट यांच्या हस्ते गोखले यांच्या तसबिरीचे (Portrait) अनावरण करण्यात आले. 

या कार्यक्रमास शहरातील गिरणी मालक, गिरणीचे अधिकारी आणि वकील (Pleaders) असे सुमारे २०० प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सभागृहातील जागेअभावी आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे ॲनी बेझंट यांचे मुख्य भाषण नंतर खुल्या मैदानावर आयोजित करण्यात आले.तत्कालीन सोलापूर हे केवळ राजकीयदृष्ट्या जागृत नव्हते, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. १९१६ मध्ये बालकामगार ही एक सामान्य बाब असताना, सोलापूरच्या गिरणी मालकांनी एक आदर्श पायंडा पाडला होता. सोलापूर थिऑसॉफिकल सोसायटी आणि गिरणी व्यवस्थापनातर्फे गिरणी कामगारांच्या मुलांसाठी एक मोफत शाळा चालवली जात होती. या शाळेत त्याकाळी ६०० विद्यार्थी इयत्ता सहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेत होते. डॉ. बेझंट यांनी या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाची पाहणी केली. मद्रास (चेन्नई) येथील मुख्यालयात पाठवलेल्या अहवालात या गिरणीचा उल्लेख 'थिऑसॉफिकल मिल' असा गौरवपूर्णरित्या करण्यात आला आहे.

सोलापूरकरांना संदेश 

आपल्या भाषणातून डॉ. बेझंट यांनी उपस्थितांना देशकार्यासाठी प्रेरित केले. नामदार गोखले यांच्या कार्यपद्धतीचा (Thoroughness) गौरव करत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, "इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रथम आपल्या मातृभूमीवर प्रेम करा आणि देशसेवेसाठी स्वतःला वाहून घ्या"असा संदेश बेझेंट यांनी आपल्या भाषणातून दिला.

तसेच, सोलापूर थिऑसॉफिकल लॉजतर्फे नागरिकांसाठी एका मोफत वाचनालयाचे (Free Reading Room) उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

संदर्भ (References):

The Vahan, "From Headquarters - Adyar, Madras", March 21, 1916.

National Archives of India, "Annie Besant launched the All-India Home Rule League''

संकलन / भाषांतर

अतुल देशपांडे

सोलापूर शहराचा इतिहास आठवणी ©





Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories