नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सोलापूर दौरा- १९३१

सोलापूरच्या इतिहासात काही दिवस सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे २६ डिसेंबर १९३१. या दिवशी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायक, आझाद हिंद फौजेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सोलापूरला भेट दिली होती. 
सोलापूरनगरीत अभूतपूर्व स्वागत
पुण्याहून निघालेली पॅसेंजर रेल्वे सायंकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचली आणि वातावरण 'सुभाषबाबू की जय' च्या घोषणेने दुमदुमून गेले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूरकरांनी केलेली तयारी पाहण्यासारखी होती. नव्या पेठेपासून बाजारपेठेपर्यंतचा रस्ता कमानी, तोरणे, पताका आणि दिव्यांच्या माळांनी सजवला होता. रस्त्यांवर सडा-रांगोळ्या घातल्या होत्या.
विशेष म्हणजे, या स्वागताच्या कमानींवर सोलापूरच्या त्या चार हुतात्म्यांचे (नरवीरांचे) फोटो लावले होते, ज्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. मिरवणुकीच्या वाटेवर नागरिकांनी नेताजींवर फुलांचा वर्षाव केला आणि अक्षता टाकल्या. रात्री साडेआठच्या सुमारास ही भव्य मिरवणूक शेठ गुलाबचंद यांच्या वाड्यापाशी विसावली.
 जनसागरासमोर ऐतिहासिक भाषण
त्यावेळच्या 'मजूर मैदानावर' (आजचे पार्क स्टेडीयम) सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५ हजार लोक आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी जमले होते. व्यासपीठावर पंढरपूरचे जोशी वकील, शिवबाळप्पा देशमुख, आमदार वैशंपायन, डॉ. अंत्रोळीकर अशा दिग्गजांची उपस्थिती होती.
सुरुवातीलाच आपल्याला मराठीत बोलता येत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नेताजींनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली.
"सोलापूर हे राष्ट्रतीर्थ आहे"
आपल्या ओजस्वी भाषणात नेताजींनी सोलापूरच्या त्यागाचा गौरव केला. ते म्हणाले, "सोलापूर हे आता केवळ धार्मिक क्षेत्र राहिले नसून ते एक राजकीय आणि राष्ट्रतीर्थ बनले आहे". मार्शल लॉ आणि सरकारी दडपशाहीला न जुमानता सोलापूरच्या जनतेने जे धैर्य दाखवले, त्याचे त्यांनी कौतुक केले. "मार्शल लॉ लादला तरी सोलापूरकर घाबरले नाहीत, उलट त्यांचा उत्साह आणि जिद्द वाढलीच आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ब्रिटिश सरकारशी तडजोड न करता 'पूर्ण स्वराज्य' मिळवण्यावर त्यांनी भर दिला. ते कडाडले, "आम्हाला चार आणे किंवा आठ आणेवाले स्वराज्य नको, तर शंभर टक्के पूर्ण स्वराज्य हवे आहे. जे अधिकार इतर देशातील नागरिकांना आहेत, तेच हक्क आम्हा भारतीयांना मिळाले पाहिजेत". तरुणांना उद्देशून ते म्हणाले की, आता विश्रांतीला वेळ नाही, जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचे आहे.
रात्री साडेअकरा वाजता सभा संपली आणि त्यानंतर दीड वाजता मद्रास एक्सप्रेसने नेताजी पुढील प्रवासाला निघाल. योगायोगाने त्याच गाडीत दक्षिणेकडील नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी हे देखील प्रवास करत होते.
एक रंजक किस्सा: 
 पंढरपूरचे स्वातंत्र्यसैनिक तात्यासाहेब गुर्जर यांची शरीरयष्टी आणि चेहऱ्याची ठेवण हुबेहूब नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी होती. इतकेच नाही तर दोघांचा चष्मा सुद्धा सारखाच होता.
१९४४ साली तात्यासाहेब मुंबईला गेले असताना, पोलिसांनी त्यांनाच 'सुभाषचंद्र बोस' समजून अटक केली! सुमारे चार तास त्यांची कसून चौकशी झाली. अखेर ते नेताजी नाहीत आणि पंढरपूरचे रहिवासी आहेत, याची खात्री पटल्यावरच दुसऱ्या दिवशी त्यांना सोडण्यात आले.
(वरील मजकूर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूर चे योगदान या श्रीकांत येळेगावकर सरांच्या पुस्तकातुन संपादित केला आहे)
जाता जाता-
नेताजींच्या मृत्यूबाबत नेमलेल्या खोसला आयोगा समोर   सोलापूर च्या बॉंक अधिकार्यांने दिलेल्या साक्षीत एक विचित्र दावा केला होता 
पी. एम. करपूरकर (साक्षीदार क्रमांक ८४) 
 हे सोलापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एजंट होते. त्यांनी असा दावा केला की, ते आपले शरीर एखाद्या रेडिओ रिसीव्हरप्रमाणे 'ट्यून' करून बोस (सुभाषचंद्र बोस) यांच्याकडून थेट संदेश प्राप्त करतात. या  हास्यास्पद कथेबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही.(आयोगाचे मत) सदर साक्षीदाराने नेताजींना प्रत्यक्षात कधीही पाहिलेले नाही, फक्त त्यांची चित्रे पाहिली आहेत. या साक्षीदाराचे रेडिओ रिसीव्हरमध्ये रूपांतर कसे झाले किंवा बोस यांनी संदेश पाठवण्यासाठी त्यांचीच निवड का केली, हे समजण्यापलीकडचे आहे. शिवाय, हे संदेश उघड केल्याने बोस यांच्या विश्वासाचा भंग होईल, असे कारण देत साक्षीदार ते संदेश सांगण्यास ठामपणे नकार देतात."
संकलन 
अतुल देशपांडे.
सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©
#solapurtales.



Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories